‘तानी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सायकल रिक्षा चालवण्याचे शिक्षण
येत्या काही दिवसांत नागपूरला गेलात आणि सायकल रिक्षात बसायचा योग आला, तर सायकल रिक्षा चालवणाऱ्याचा चेहरा नीट पाहून घ्या. घाम गाळीत तुमचे ओझे हाकणारा चेहरा कदाचित मराठीतील दिग्गज अभिनेते अरुण नलावडे यांचाही असू शकतो. ‘श्वास’सारख्या अत्यंत संवेदनशील चित्रपटात तेवढीच संवेदनशील भूमिका साकारणाऱ्या अरुण नलावडे यांच्यावर ही वेळ दुर्दैवाच्या फेऱ्यांमुळे मात्र आलेली नाही. अजय ठाकूर निर्मित ‘तानी’ या चित्रपटात अरुण नलावडे सायकल रिक्षाचालकाची भूमिका करत असून त्यासाठी गेले दोन तीन दिवस ते नागपूरच्या रस्त्यांवर सराव करत आहेत.
या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर अनेक दिवसांनी आव्हानात्मक भूमिका मिळाल्याच्या आनंदात आपण होतो. मात्र नागपूरमध्ये येऊन सायकल रिक्षा चालवली आणि हे आव्हान किती कठीण आहे, हे लक्षात आल्याचे नलावडे यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. अरूण नलावडे सध्या नागोजी नावाच्या सायकल रिक्षाचालकाकडून सायकल रिक्षा कशी चालवावी, याचे धडे घेत आहेत. सायकल रिक्षा चालवताना तोल सांभाळणे खूप महत्त्वाचे असते. तसेच चढावावर रिक्षा न्यायची असेल, तर चालकाला खाली उतरून ती ओढत नेण्याशिवाय पर्याय नसतो. हे काम खूपच कठीण आणि दमछाक करणारे आहे, असे नलावडे सांगतात. नलावडे यांच्या उजव्या गुढघ्याात दोन सांध्यांमध्ये थोडी पोकळी आहे. त्यामुळे त्या पायावर जोर देऊन काम करणे त्यांना कठीण जाते. त्यातच नागपूरमध्ये सध्या ५ अंश सेल्सिअस एवढी थंडी आहे. त्यामुळे हाडे दुखतात.
ही कहाणी तळागाळातल्या माणसांची, त्यांच्या आशाआकांक्षा व स्वप्नांची आहे. सध्या काही दिवस आपण त्यांच्या यातना अनुभवत आहोत. माणसाला पोट भरण्यासाठी इतरांच्या शरीराचे ओझे दररोज वाहायला लागणे, हे खरोखरच दुर्दैवी आहे. या भूमिकेसाठी केवळ सायकल रिक्षा चालवणे हेच आव्हान नव्हते. तर वऱ्हाडी बोली आत्मसात करणेही आवश्यक होते. सामान्यातला सामान्य माणसाला आपलेसे वाटेल, असे हे पात्र आहे, असेही अरूण नलावडे यांनी विश्वासाने सांगितले.