25 May 2016

प्रशांत दामले यांनी रंगमंच कधीच सोडू नये

मराठी माणसाच्या मनात तीन व्यक्तींनी कायमचे घर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातून जाऊ

प्रतिनिधी,मुंबई | January 7, 2013 2:16 AM

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केल्या मराठीजनांच्या भावना
विक्रमी १०, ७०० वा प्रयोग थाटात साजरा
मराठी माणसाच्या मनात तीन व्यक्तींनी कायमचे घर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्यातून जाऊ नये, सचिन तेंडुलकरने आपली बॅट खाली ठेवू नये आणि प्रशांत दामले यांनी रंगमंच कधीच सोडू नये, अशी प्रत्येकच मराठी रसिकाची इच्छा असते. मात्र पहिल्या दोन गोष्टी आपल्या हातात नाहीत. पण प्रशांत दामले यांनी तरी ही गोष्ट लक्षात ठेवावी, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तमाम मराठी रसिकांच्याच भावना व्यक्त
केल्या.
प्रशांत दामले यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीतील विश्वविक्रमी १०, ७००वा प्रयोग शनिवारी रवींद्र नाटय़ मंदिर येथे रंगला. त्यानिमित्ताने प्रशांत दामले सत्कार समितीच्या वतीने प्रशांत दामले यांचा सत्कारही करण्यात आला.
प्रशांत दामले यांची कारकीर्द अतिशय रमणीय आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक नाटकातून मराठी माणसांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांना पद्म पुरस्कार दिला जावा, अशी शिफारस आपण केंद्र सरकारकडे करू, असे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिले. या कार्यक्रमासाठी महापौर सुनील प्रभू, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्यासह वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, चंद्रकांत कुलकर्णी, स्वाती चिटणीस, कविता लाड, निर्मिती सावंत असे अनेक कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे पुण्यातील एका पूर्वनियोजित कार्यक्रमात अडकलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही थोडेसे उशिरा या कार्यक्रमाला आले. हा ऐतिहासिक क्षण आपल्याला चुकवायचा नव्हता, असे सांगत त्यांनी प्रशांत दामले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुरुषोत्तम बेर्डे, सुधीर भट व अशोक पत्की या तिघांचाही सत्कार करण्यात आला. ‘टुरटुर’ या नाटकाद्वारे पुरुषोत्तम बेर्डे यांनी प्रशांत दामले यांना रंगभूमीवर आणले. त्यानंतर दामले यांच्या १४ नाटकांचे तब्बल सात हजारांहून अधिक प्रयोग ‘सुयोग’ या संस्थेने आणि पर्यायाने सुधीर भट यांनी सादर केले. तर, १५ नाटकांत प्रशांत दामले यांना ७६ सुमधुर गाणी देणाऱ्या अशोक पत्की यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला.
आज आपण जे काही आहोत, त्यात आपले सहकलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि कुटुंबीय यांचा फार मोठा वाटा आहे, असे प्रशांत दामले यांनी सत्काराला उत्तर देताना
सांगितले.

First Published on January 7, 2013 2:16 am

Web Title: prashant damle should never took off from theater act r r patil