सध्या लॅक्मे फॅशनचे वारे वाहात असून, वर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकीत फॅशन शो आहे. लॅक्मे फॅशन वीकच्या शानदार सांगता सोहळ्यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खानने फॅशन डिझायनर सब्यासाचीसाठी रॅम्प वॉक केले. लॅक्मे फॅशन वीकची सदिच्छादूत असलेल्या करिनाने आपल्या गर्भारपणाबद्दल आणि कामाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. गरोदर स्त्रिया चालतात, मी तर उडूदेखील शकते, असे करणे स्वाभाविक नाहीये का? माझ्यासाठी हे स्वाभाविक आहे. सतत याबाबत प्रश्न का विचारण्यात येतो, हे समजत नसल्याचे या प्रश्नाला उत्तर देताना ती उपहासाने म्हणाली. आपला वेगळा छाप उमटविणाऱ्या करिनासाठी पोटातील बाळासह रॅम्पवॉक करणाचा अनुभव खास होता. येऊ घातलेल्या बाळासह पहिल्यांदा रॅम्पवर चालत असल्याने माझ्यासाठी हा रॅम्पवॉक नेहमीच लक्षात राहिल, अशा शब्दांत भावूक झालेल्या करिनाने आपले मनोगत व्यक्त केले. करिनाने सब्यासाचीने डिझाइन केलेला लहेंगा परिधान केला होता. याचसह ‘लॅक्मे फॅशन विक २०१६’ची सांगतादेखील झाली. मी एकटी नसून, आता तर आम्ही दोघं असल्याचे करिना पोटातील बाळाला उद्देशून म्हणाली. यापूर्वी मी कधीच सब्यासाचीसाठी रॅम्पवॉक केला नव्हता. हा क्षण नेहमीच माझ्या लक्षात राहिल. यावेळी मी खरंच भावूक झाले असल्याचे म्हणत तिने आपल्या भावनांना वाट करून दिली.
सोनेरी वर्क असलेला भरजरी लहेंगा आणि कुर्ती स्टाइल चोली करिनाने परिधान केली होती. डोक्यावर दुपट्टा घेतला होता. तिचा हा लूक एखाद्या शाही वधूसारखा दिसत होता. गरोदर अवस्थेतदेखील करिनाने आपल्या कामावर परिणाम होऊ दिलेला नाही. याविषयी बोलताना ती म्हणाली की, मी कधीच कॅमेऱ्यापासून दूर जाणार नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करत राहीन. अभिनय माझी आवड असून, अभिनय करण्यातच मला आनंद मिळतो. जो माझ्या चेह-यावरदेखील झळकतो.