विविध चित्रवाहिन्यांवरील काही मालिकांचा मग त्या मराठी असो किंवा हिंदीतल्या असो अपवाद केला तर प्रेक्षक त्यांना कंटाळले आहेत. तेच तेच चावून चोथा झालेले विषय आणि पाणी घालून वाढवलेले भाग यामुळे त्या मालिका पाहणे म्हणजे सहनशीलतेचा अंत झालेला आहे. मात्र असे असले तरीही सर्वसामान्य प्रेक्षक मालिका पाहणे सोडत नाहीत. प्रत्येक वाहिनीच्या मालिकेने आपला स्वत:चा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. प्रेक्षक या मालिकांना नावे ठेवत त्या पाहतो. या मालिका पाहताना त्यांच्या मनात जुन्या आणि नव्या म्हणजे आत्ताच्या मालिकांची अगदी सहजपणे तुलना होते आणि ‘जुने ते सोने’ म्हणून जुन्या मालिकांचे कौतुकही केले जाते. त्यांचे महत्त्व जोखूनच पूर्वी गाजलेल्या मालिका आता पुन्हा प्रेक्षकांना दाखवण्यासाठी वाहिन्यांनी कंबर कसली आहे. यात हिंदीबरोबरच मराठी वाहिन्यांनीही आघाडी घेतली आहे.

अनेक जणांना जुन्या आठवणीत रंगणे आवडते. मालिकांच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल. जुन्या मालिकांचे स्मरणरंजन प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाते. जुन्या मालिका आणि प्रेक्षकांचे घट्ट नाते तयार झालेले असते. या मालिका त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद देतात. त्यामुळेच दूरदर्शनसह काही खासगी वाहिन्यांनीही पुन्हा एकदा जुन्या मालिकांचे प्रसारण किंवा जुन्या मालिका नव्या संचात व नव्या वळणासह प्रसारित करण्याचे ठरविले आहे. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुन्हा सुरू झालेल्या ‘अग्निहोत्र’ व ‘स्वप्नांच्या पलीकडले’या दोन मालिका. ‘राजा शिवछत्रपती’ ही गाजलेली मालिकाही या वाहिनीने पुन्हा प्रसारित केली होती. झी मराठीनेही ‘अवंतिका’ ही जुनी गाजलेली मालिका पुन्हा प्रसारित केली होती. दूरदर्शनचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळात सादर झालेल्या ‘मालगुडी डेज’, ‘हमलोग’, ‘वागळे की दुनिया’, ‘फौजी’ या मालिकाही लवकरच पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रसारित होणार आहेत. पुन्हा सादर होणाऱ्या या मालिकांना जुना (पूर्वीचा) प्रेक्षक तर मिळतोच पण काही प्रमाणात नवा प्रेक्षकही मिळतो.

२५ ते ३० वर्षांपूर्वीचा तो काळ खरोखरच वेगळा होता. ८० ते ९० च्या दशकात आत्तासारखे विविध वाहिन्यांचे आणि मालिकांचे पेव फुटलेले नव्हते. मनोरंजनासाठी मुंबई दूरदर्शन केंद्र आणि दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी अशा दोनच मुख्यत्वे वाहिन्या होत्या. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील ‘चिमणराव गुंडय़ाभाऊ’ हा कार्यक्रम आणि म्हटले तर मालिका लोकप्रिय ठरली होती. अगदी अमराठी भाषकांमध्येही या मालिकेने स्थान मिळविले होते. राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘हमलोग’, ‘बुनियाद’, ‘नुक्कड’, ‘मालगुडी डेज’ आणि अन्यही काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्या मालिका आजही प्रेक्षक विसरू शकत नाही हेच त्या मालिकांचे यश आहे.

मराठीपुरते बोलायचे झाले तर मुंबई दूरदर्शनच्या काळात अन्य कोणत्याही खासगी वाहिन्या नसल्याने दूरदर्शनची मक्तेदारी होती. मनोरंजनाच्या क्षेत्रात अल्फा मराठी (आत्ताची झी मराठी) या खासगी वाहिनीने प्रवेश केला आणि सारे चित्र बदलले. दैनंदिन मालिकांच्या क्षेत्रात झी मराठीने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात किंवा अगदी अलीकडच्या काही वर्षांतही झी मराठीवरून दर्जेदार मालिका सादर झाल्या. पण आता काही अपवाद करता मालिकांचा दर्जा सुमार झाला आहे. पुढे ई टीव्ही मराठी (आत्ताचे कलर्स मराठी), स्टार प्रवाह, मी मराठी (आता बंद झाले), साम मराठी आदी खासगी मनोरंजन वाहिन्या सुरू झाल्या. त्या त्या वाहिन्यांनीही आपला प्रेक्षकवर्ग तयार केला असला तरीही या सर्वच वाहिन्यांवरील मालिकांच्या बाबतीत काही तरी हरवल्यासारखे वाटते आहे हे नक्की. सुजाण प्रेक्षकही ते नक्कीच मान्य करेल. आत्ताच्या मालिका, त्याचे विषय आणि ८० ते ९० च्या दशकातील मालिका यांची तुलना केली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मालिकांचे मर्यादित भाग. सुरुवातीला तर १३ भागांच्याच मालिका असत. नंतरच्या काळातही मालिकांचे भाग वाढले पण ते आत्ताच्या मालिकांसारखे पाणी घालून वाढवलेले किंवा ओढून-ताणून वाढवलेले नव्हते. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘हमलोग’, ‘बुनियाद’, ‘नुक्कड’ यांसारख्या मालिका दीर्घकाळ चालल्या. मात्र त्यात सासू-सुना भांडणे, एकमेकांविरोधातील कटकारस्थाने, बाहेरख्यालीपणा, पुरुषांनी बाईचे कपडे घालून केलेले पांचट विनोद, अंगविक्षेप यांचे प्रमाण कमी होते, नव्हतेच किंवा आत्तासारखा त्याचा अतिरेक झाला नव्हता. सध्या विविध वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आचरटपणा कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. प्रेक्षकही त्याला सरावला आहे किंवा मालिका सादर करणाऱ्यांनी/ वाहिन्यांच्या प्रमुखांनीही प्रेक्षक पाहत आहेत ना, मग त्यांच्या माथी काहीही मारा, असे धोरण ठरविले आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिकांमधून सध्या जे काही चालले आहे ते पाहता चांगल्या कल्पना किंवा लेखकांचा दुष्काळ असावा किंवा मालिकांच्या लेखकांना स्वातंत्र्य दिले जात नसावे आणि वाहिनीच्या प्रमुखांना जे व जसे हवे आहे तसे त्यांना लिहावे लागत असावे अशी एक शंका आहे. आत्ताच्या मालिकांच्या तुलनेत तेव्हा मालिकांच्या सादरीकरणाचे तंत्र जुने होते तरीही मालिकांचा दर्जा टिकवून ठेवलेला होता. तो आत्ताच्या इतका (काही अपवाद वगळता) घसरलेला नव्हता. मालिकेतील विषय सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आणि आपलेच आहेत असे वाटत होते.

आजच्या काळातही काही मालिका दर्जेदार आणि मनात घर करून राहणाऱ्या झाल्यातही पण तुलनेत त्यांची संख्या कमी आहे आणि म्हणूनच ‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे वाहिन्यांनी पुन्हा एकदा जुन्या मालिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. खासगी दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी दूरदर्शननेही आपल्याकडील सुवर्णकाळातील काही मालिका प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकांच्या प्रेक्षकांवर ‘जुने ते सोने’ असे म्हणण्याची आणि पाहण्याची वेळ आली आहे.

आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्या जुन्या मालिका पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या अनेक मालिका पुन्हा नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. काही मालिकांमध्ये नवीन कलाकार असतील तर काहींच्या कथानकांमध्ये वेगळी गोष्ट सादर केली जाणार आहे तर काही जुन्या मालिका परत सादर होणार आहत. ‘हम पाँच’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका आता ‘हम पाँच फिरसे’ नावाने सादर होणार आहे. ‘बिग मॅजिक’ वाहिनीवर दाखवल्या जाणाऱ्या  या मालिकेची निर्मिती ‘एस्सेल व्हिजन’ने केली आहे. या महिन्याअखेरीस ही नवीन मालिका सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. ‘साराभाई वस्रेस साराभाई-२’ लवकरच वेबसीरिजच्या स्वरूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. ‘तेनालीरामा’, ‘यह जो है जिंदगी’, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशा जुन्या मालिकाही पुन्हा छोटय़ा पडद्यावर येणार आहेत. १९९४ ते १९९६ दरम्यान आलेली ‘चंद्रकांता’ ही मालिकाही ‘व्हीएफएक्स’च्या नव्या तंत्रज्ञानासह आणखी भव्य स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.