आपल्या कामानिमित्त अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच जगभर फिरत असते. या तिच्या प्रवासात तिच्यासोबत सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. पण यातही तिच्यासोबत कायम एक अशी गोष्ट असते जी ती कधीच विसरत नाही. जर ही गोष्ट तिच्यासोबत नसेल तर मात्र ती फार बैचेन होते.

प्रियांकाची ही सगळ्यात प्रिय गोष्ट म्हणजे तिचे वेगळ्या पद्धतीचा नेकलेस. हा नेकलेस तिच्या दिवंगत बाबांची म्हणजे डॉ. अशोक चोप्रा यांची सतत आठवण करुन देतो. एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी दिलेल्या मुलाखतीत तिने आपले प्रवासाचे गुपीत सांगितले आहे. सोन्याच्या जाड चैनमध्ये रत्न, धर्माचे प्रतिक असलेली चिन्ह, रूद्राक्ष आणि एक फोटो लॉकेट स्वरुपात या खास नेकलेसमध्ये आहे. प्रियांकासाठी हा नेकलेस तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या नेकलेसबद्दल अधिक बोलताना ती म्हणाली की, हा नेकलेस तिच्या बाबांची निशाणी आहे. कर्करोगाने सुमारे चार वर्षांपूर्वी प्रियांकाच्या बाबांचा मृत्यू झाला होता. प्रियांकाच्या आईने भारतात सोन्याची एक मोठी साखळी विकत घेतली आणि त्यात फक्त एक खडा होता. हिंदू धर्माच्या पौराणिक कथेनुसार हा खडा आरोग्यासाठी चांगला असतो.

प्रियांका पुढे सांगते की, ‘तिचा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, पण जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आजारी असते तेव्हा, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवता.’ यामुळे पुढील आठ वर्षांत कुटूंबातील लोकांनी जगभरात ज्या ज्या ठिकाणी गेले तिकडची धार्मिक चिन्ह या साखळीमध्ये घातली. प्रियांका सांगते की, ‘ही साखळीनंतर एवढी जड झाली की, तिच्या बाबांनी ती घालताही येत नव्हती.’

वडिलांच्या निधनानंतर प्रियांकाने त्यातल्या काही गोष्टी काढून टाकल्या. पण ही साखळी ती नेहमीच वापरते. ती म्हणते की, ‘या नेकलेसमुळे जगभर फिरतानाही मला कुटुंबापासून दूर आहे असे वाटत नाही. भलेही संपूर्ण जग हे तुमचे घर असले तरी तुम्ही जिकडून येता, त्याची गोष्टच काही वेगळी असते. हा नेकलेस मला आपल्या मातीशी जोडून ठेवतो.’