आपल्या पहिल्यावहिल्या बहुचर्चिच हॉलीवूडपट ‘बेवॉच’चं चित्रीकरण संपवून काही दिवसांच्या सुट्टीसाठी मायदेशात परतलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही मुंबईत आल्यावरही सुट्टीचा आनंद न घेता ‘बेवॉच’ सिनेमाच्या प्रसिद्धी दौऱ्यांमध्येच व्यग्र झाली आहे. केवळ ‘बेवॉच’च नाही तर तिच्या ‘पर्पल पेबल्स’ या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद, याच बॅनरखाली अन्य प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती सुरू आहे त्यांच्या घडामोडी असं सगळंच तिला साजरं करायचं आहे. यानिमित्ताने, भारतीय चित्रपटसृष्टी मुळातच समृद्ध आहे, कारण तिला विविध भाषांतील चित्रपटसृष्टीची उत्तम साथ आहे. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट अशी सातत्याने होणारी विभागणीच चुकीची असल्याचे मत प्रियांकाने व्यक्त केले.

सध्या मुंबईत थोडय़ा दिवसांसाठी का होईना येता आल्याचा आनंद आहेच, मात्र ‘व्हेंटिलेटर’ला मिळालेल्या यशामुळे हा आनंद द्विगुणित झाल्याचे प्रियांकाने गप्पांच्या सुरुवातीलाच सांगितले. माझ्या आतापर्यंतच्या या संपूर्ण अभिनय कारकिर्दीत मी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या आणि मला स्वत:ला आव्हानात्मक वाटतील अशा भूमिका स्वीकारल्या आहेत. यामध्ये ‘बर्फी’, ‘मेरी कोम’ यांसारख्या भूमिका आहेत. मात्र खलनायकी छटा असलेल्या भूमिकाही मी ‘सात खून माफ’, ‘ऐतराज’ यांसारख्या चित्रपटांमधून केल्या आहेत. त्यामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या भूमिका केलेल्या असताना आता अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावल्यावर ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटासाठी खलनायिका साकारणं हा माझ्यासाठी आव्हानात्मक अनुभव असल्याचं प्रियांका सांगते. ‘बेवॉच’ हा प्रियांकाचा पहिलाच हॉलीवूडपट असूनही यामध्ये ती व्हिक्टोरिया नावाची खलनायिका साकारते आहे. व्हिक्टोरिया अंशत: भारतीय वंशाची दाखवली असल्याने प्रियांकाने या भूमिकेसाठी हातात ‘ओम’ चिन्हाची साखळी घातली आहे. शिवाय, यात ती हिंदी संवादही बोलताना दिसणार आहे.

याआधी प्रियांकाने ‘क्वाँटिको’ या प्रसिद्ध इंग्रजी मालिकेतही काम केले आहे. किंबहुना ‘क्वाँटिको’मुळे मला ‘बेवॉच’साठी विचारणा झाली, असं सांगणारी प्रियांका हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल हॉलीवूडमध्ये अनेक गरसमज आहेत. इकडच्या कलाकारांना इंग्रजी बोलता येत नाही, त्यांचा अभिनय अशा अनेक गोष्टींबद्दल गैरसमज आहेत. मात्र आपल्याविषयीचे हे गरसमज दूर करायचे असतील तर आपण स्वत: तिकडे उत्तम काम केलं पाहिजे, याची जाणीव मला झाली. शिवाय, इतकी र्वष हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाचा अनुभव आणि आजवर मी ज्या दिग्दर्शकांसोबत काम केले त्यांनी मला उत्तम काम करणं शिकवलं असल्याने तिथे गेल्यावर मी अभिनयाच्या तांत्रिक बाजूनेही उत्तम काम करू शकले. या अनुभवाच्या शिदोरीमुळेच तिथे जाऊन मला कोणाकडून काहीही शिकावं लागलं नाही, असं ती आनंदाने सांगते. पण काहीही झालं तरी हॉलीवूडमध्ये   आपली ओळख निर्माण करणं हे सोपं नाही, असंही ती ठामपणे म्हणते. ‘मी भारतात नामांकित कलाकार असले तरी याचा अर्थ परदेशातही मला सगळे ओळखत असतीलच असं नाही. त्यामुळे मी प्रत्येक वेळी स्वत: पुढे होऊन हस्तांदोलन करीत ‘मी प्रियांका चोप्रा.. भारतीय अभिनेत्री आहे’ अशी स्वत: ओळख करून देत होते, हे सांगताना प्रियांका अजिबात कचरत नाही. गेले कित्येक महिने प्रियांका चोप्रा हिंदी चित्रपटांतून दिसलेली नाही. त्यामुळे ती इथे आली की अनेक चित्रपटांची नावं चर्चेत येतात. तिने मात्र आपण अजूनही कुठला हिंदी चित्रपट करीत नाही आहोत, असं स्पष्ट करीत याबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा संकेत दिला. न्यूयॉर्कला असताना मला बरेच दिग्दर्शक भेटून गेले आहेत. शिवाय इथे आल्यावरही मी बऱ्याच जणांना भेटते आहे, पण अजूनही माझं काम नक्की काही ठरलं नसल्याचं तिने सांगितलं. याशिवाय, अंतराळवीर कल्पना चावला यांच्या चरित्रपटासाठी तिचं नाव निश्चित झालं असल्याचं बोललं जात असलं तरी मी ‘क्वाँटिको’साठी एबीसी या निर्मिती संस्थेशी अजूनही करारबद्ध आहे. सध्या त्याच्या तिसऱ्या पर्वाच्या बातम्या कानावर येत असल्याने इतक्यात भारतात कोणालाच होकार किंवा नकार काहीच कळवलं नसल्याचं तिने सांगितलं.

‘व्हेंटिलेटर’चं यश ही सध्या माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण हा चित्रपट माझ्या वडिलांना समíपत केला होता.  चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान मिळाला, यामुळे खूप आनंदित आहे, असं म्हणणारी प्रियांका विविध भाषिक चित्रपटांच्या निर्मितीमागचं कारणही गप्पांमध्ये सहज सांगून जाते. ‘मी जेव्हा चित्रपटसृष्टीत आले तेव्हा माझं इथे कोणी ओळखीचं नव्हतं. मीच स्वत:ची ओळख इथे निर्माण केली. त्यामुळे माझ्या छोटय़ा निर्मिती संस्थेखाली नवख्या दिग्दर्शकांना आणि कलाकारांना संधी देण्याचं काम मला करायचं आहे. परदेशात असले तरी तिथूनही मी हे निर्मितीचं काम सांभाळते आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेमवर माझं लक्ष असतं. त्यासाठी माझ्या सहकाऱ्यांचे परदेशात सतत दौरे चालू असतात, असंही तिने सांगितलं. येत्या काळात आणखी एक मराठी, भोजपुरी आणि सिक्किम या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची निर्मिती प्रियांका करते आहे. सिक्किममध्ये प्रथमच त्यांच्या भाषेतील चित्रपट निर्माण करण्याच मान तिच्या निर्मिती संस्थेला मिळाला आहे. यासाठी तेथील स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञान या निर्मितीमध्ये समाविष्ट करून घेणार असल्याची माहितीही तिने दिली.

हिंदीप्रमाणेच हॉलीवूडपटांची संस्कृतीही नायकप्रधान असल्याचंच ती स्पष्ट करते. तिथेही नायक हाच नायिकेपेक्षा मोठा दाखवला जातो. त्यामुळे दोन्हीकडे सारखी परिस्थिती आहे. आता हळूहळू हिंदी चित्रपटांमध्ये बदल होतो आहे. इथे आता नायिकाप्रधान चित्रपटांना यश मिळतं आहे, त्याचप्रमाणे हॉलीवूडमध्येही नायिकाप्रधान संस्कृती रुजत असल्याचं प्रियांकाने सांगितलं. मात्र हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे, असंही ती सांगते. तिथे सकाळी आठ वाजताचे चित्रीकरण असेल तर बरोबर आठ वाजून पाच मिनिटांनी चित्रीकरणाला सुरुवात होते. हिंदी चित्रपटांमध्ये सबकुछ चलता है.. वृत्तीने काम करायची सवय लागली होती. शिस्तीचा दूरदूर संबंध नव्हता. त्यामुळे सुरुवातीला तिथे काम करणं जड गेलं, शिस्तप्रियता अंगी बाणवावी लागली, असं ती हसत हसत म्हणते. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने दोन्हीक डे फारसा फरक जाणवला नाही, असं ती सांगते. ‘बेवॉच’ चित्रित करीत असताना मला मी एखाद्या हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण करीत असल्यासारखंच वाटत होतं. मात्र टेलिव्हिजन आणि चित्रपट माध्यमांमध्ये असलेल्या कामाच्या पद्धतीत फरक जाणवल्याचं प्रियांकाने सांगितलं. याआधी टेलिव्हिजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने ‘क्वाँटिको’चं चित्रीकरण करीत असताना एकामागोमाग एक सीन करताना प्रचंड दमछाक होत असल्याचं तिने नमूद केलं. कामाव्यतिरिक्त परदेशात राहताना आपलं काम, आई-नातेवाईक सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न करणारी प्रियांका खाण्याच्या आघाडीवर मात्र हळवी होते. मला घरचे जेवण जेवायची सवय आहे, त्यामुळे सध्या तरी अमेरिकेतील वास्तव्यासाठी मी खास इथून एक स्वयंपाकीही तिथे नेला आहे. जेणेकरून माझी घरचं खायची सवय मोडणार नाही, असं ती सांगते. सध्या तरी तिच्या क्षेत्राबद्दल बोलायचं तर तिची पाचही बोटं तुपात आहेत, पण तरीही ‘बेवॉच’च्या यशावर तिची पुढची वाटचालही अवलंबून असणार आहे.