बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वी ‘क्वांटिको’ या मालिकेच्या सेटवर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती आता ठीक असल्याने तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. इतकेच नाही तर ही ‘देसी गर्ल’ पुन्हा एकदा तिच्या कामावर रुजू झाली आहे. सोमवारपासूनच प्रियांका ‘क्वांटिको’च्या सेटवर पुन्हा दाखल झाली असून तिने नव्या जोमाने चित्रिकरणास सुरुवात केली आहे. प्रियांकाच्या प्रतिनिधींनीच यासंदर्भातील माहिती द हॉलिवूड रिपोर्टरला दिली होती.

दरम्यान, सेटवर जखमी झाल्यानंतर प्रियांकाने काही दिवस आराम करण्याचा निर्णय घेतला होता. ‘क्वांटिको’ या परेदशी मालिकेत काम करत असलेल्या प्रियांकाला गुरुवारी सेटवर दुखापत झाली. त्यावेळी तिच्या डोक्याला इजा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यानंतर प्रियांकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात योग्य ते उपचार घेतल्यानंतर तिला आता घरी पाठविण्यात आल्याचे, सेटवरील सूत्रांनी सांगितले. ‘क्वांटिको’ या सिरीजच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीत म्हटले की, न्यू यॉर्कच्या सेटवर एक किरकोळ घटना घडली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रियांका चोप्रा काही काळासाठी तिच्या घरीच आराम करत होती. तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. प्रियांका जखमी झाली असली तरी त्याचा सिरीजच्या चित्रिकरणावर कोणताही परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे प्रियांकाशिवायच काही दिवसांसाठी या सिरीजचे चित्रिकरण करण्यात येत होते.

वाचा: ब्रेकअपनंतर कधी एक्स बॉयफ्रेण्डला किस केलेस का?

प्रियांका चोप्रा सध्या तिचा जास्त वेळ भारताबाहेरच व्यतीत करत आहे. हॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन सिरीजमध्ये व्यग्र असणारी प्रियांका चोप्रा सध्या निर्मिती क्षेत्रातही तिचे योगदान देत आहे. ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर प्रियांकाने पंजाबी भाषेतील चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्राही उरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागोमाग आता प्रियांकाने पुन्हा एकदा तिचा मोर्चा मराठी चित्रपटाच्या निर्मितीकडे वळविला आहे. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.