यंदाच्या ८८ व्या ऑस्कर पारितोषिक वितरणास क्वांटिको या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या सादरकर्त्यांमध्ये तिला स्थान मिळाले आहे. सादरकर्त्यांच्या दुसऱ्या यादीत स्टीव्ह कॅरेल, क्विन्सी जोन्स, ब्यूंग हून ली, जेरेज लेटो, ज्युलियानी मूर, ऑलिव्हिटा मून, मार्गोट रॉबी, जॅसन सेगेल अँडी सेरकीस, जे.के. सिमॉन्स, केरी वॉशिंग्टन व रीज विदरस्पून यांचाही समावेश आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ फेम प्रियांका चोप्रा हिने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, की आपण अ‍ॅकॅडमी पुरस्कार सोहळयाची वाट पाहत आहोत, पुरस्कार समारंभाची ती रात्र भारून टाकणारी असते. प्रियांका चोप्रा हिला अनेक सहकारी व चित्रपट अभिनेते-अभिनेत्री यांनी शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. आता मी ऑस्कर २०१६ सोहळ्यासाठी मला शोभेल अशा पोशाखाचा शोध सुरू केला आहे. प्रियांका ही यंदाच्या ऑस्कर पुरस्कारात एकमेव भारतीय प्रतिनिधी आहे. भारताने पाठवलेला ‘कोर्ट’ हा चित्रपट ऑस्कर स्पर्धेतून आधीच बाद झाला आहे. ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा कॅलिफोर्नियातील हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये २८ फेब्रुवारीला होणार आहे.