सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? या प्रश्नाचे उत्तर जेव्हा जाहीर होते तेव्हा बॉलिवूडमधली वर्षभराची मेहनत कलाकारांसाठी, दिग्दर्शकांसाठी, त्यांच्या युनिटसाठी फळाला येते. या पुरस्कारांचा जो विजेता आहे तो पुढचे वर्षभर तरी नामवंत दिग्दर्शकांसाठी, प्रॉडक्शन हाऊसेससाठी हुकमी एक्का असतो. यावर्षीचा पहिला पुरस्कार सोहळा पार पडला तो रिलायन्सचा ‘बिग स्टार एन्टरटेन्मेट पुरस्कार’. आणि पहिले दान पडले आहे ते अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या पारडय़ात. प्रियांकाला यावर्षीचा पहिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना कैफ, करीना कपूर, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. यात पुन्हा अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा अशी दुसऱ्या फळीची भर पडते आहे. गेल्या वर्षी विद्या बालनने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिध्द केले होते. या वर्षांच्या सुरूवातीला आलेला ‘अग्निपथ’ बॉक्सऑफिसवर शंभर कोटीच्या वर कमाई करून गेला. त्यामुळे प्रियांकालाही शंभर कोटीचे मूल्य प्राप्त झाले. त्यापाठोपाठ आपण अभिनयाबरोबरच संगीतातही मागे नाही हे प्रियांकाने जगाला दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने आपल्या गाण्यांचा ‘इन माय सिटी’ हा अल्बम प्रदर्शित केला. आणि जगाने तिच्या या गोड गळ्याची दखल घेतली. या सगळ्यामुळे प्रियांकाचा भाव आधीच वधारला होता. त्यात अनुरागच्या ‘बर्फी’ने आणखी गोडवा आणला.
अनुराग बसूच्या ‘बर्फी’ या चित्रपटात प्रियांकाने ‘झिलमिल’ या ऑटिस्टिक मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. तिने या व्यक्तिरेखेत कमालीची जान आणली. शिवाय, ‘बर्फी’नेही शंभर कोटीच्या वर कमाई केली असल्याने आघाडीची नायिका म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तिच्या या समर्थ आणि संवेदनशील अभिनयाची पावतीच तिला वर्षांतील या पहिल्या पुरस्काराने दिली आहे.