अवधूत गुप्तेंच्या ‘जय महाराष्ट्र ढाबा भतिंडा’ चित्रपटातून मराठी नायक पंजाबमध्ये पोहोचला होता. आता ही प्रेमकथा पंजाबमधून बिहारकडे सरकली आहे. आगामी ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटात अभिजीत भोसले हा मराठी तरुण आणि तारा यादव या बिहारी तरुणीची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. नायकाचे नाव अभिजीत असले तरी यावेळी ही भूमिका अभिनेता उमेश कामत करणार आहे.
‘शेमारू’ एंटरटेन्मेटची निर्मिती असलेल्या ‘पुणे व्हाया बिहार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले असून उमेश कामत आणि मृण्मयी देशपांडे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या अभिजीत भोसले या तरुणाचे त्याच्याच महाविद्यालयातील तारा यादव या बिहारी तरुणीवर प्रेम आहे. ताराला याची कल्पना नाही. ताराचे वडील बिहारमध्ये प्रतिष्ठित राजकारणी असून ते आपल्या स्वार्थासाठी तेथील श्रीमंत तरुणाबरोबर ताराचा विवाह निश्चित करतात. आणि मग आपला नायक नायिकेला परत मिळवण्यासाठी थेट बिहारमध्ये पोहोचतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटात पहिल्यांदाच उमेश कामत आणि मृण्मयी देशपांडे ही नवी जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
भरत जाधवचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असून प्रताप निंबाळकर हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर त्याने साकारला आहे. चित्रपटाचे संगीत अमिर हडकर यांचे असून अविनाश खर्शीकर आणि रत्नकांत जगताप हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ३१ जानेवारीला ‘पुणे व्हाया बिहार’ महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.