प्रियांका चोप्रा हे नाव आता नेहमीच चर्चेत असते. चित्रपट, टेलिव्हिजन सिरीज, निर्मिती क्षेत्र या विविध कारणांनी प्रियांकाचे नाव चर्चेत असते. यामध्ये भर घातली आहे ती म्हणजे तिला नुकत्याच मिळालेल्या एका पुरस्काराने. पीपल्स चॉईस अवॉर्ड्स २०१७ च्या मानचिन्हावर दुसऱ्यांदा प्रियांकाच्या नावाची मोहोर उमटली आहे. पण, या पुरस्कार सोहळ्याला येण्याच्या काही दिवसांपूर्वीच ही देसी गर्ल एका अपघातातून सावरली होती. पीपल्स चॉईस अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रियांकाने तिच्या अपघाताबद्दल सांगितले.

त्या अपघाताविषयी बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘मी काही थरारक दृश्यांचे चित्रिकरण करत होते. त्यावेळी थोडाफार पाऊस पडत होता. इथल्या न्यू यॉर्कच्या भाषेत म्हणायचं झालं तर हलकीशी बर्फवृष्टीही म्हणू शकता. मी वेंधळ्यासारखे रबरचे बूट घातले होते. मी याआधीही थरारदृश्ये केली आहेत. मला कधीही दुखापत झाली नव्हती. पण, इथे कोणा एका दुसऱ्यालाच पडण्यापासून वाचविण्याच्या नादात मीच ओल्या रस्तावरुन घसरुन पडले आणि माझ्या डोक्याला मार लागला. गाडीच्या बंपरला आणि रस्त्याला माझं डोकं धडलं आणि त्यामुळे मला मार लागला. त्यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आलं’. या अपघातानंतर प्रियांकाने तीन दिवसांची विश्रांती घेतली होती. त्याबद्दल सांगताना प्रियांका म्हणाली, ‘मला तीन दिवस कामावर (चित्रिकरणासाठी) जाता आले नाही. त्या तीन दिवसांमध्ये मी सोफ्यावर बसून ‘ऑडिओ बूक्स’ ऐकत होते. कारण, मला टिव्ही न पाहण्याचा आणि पुस्तकं न वाचण्याचा सल्ला देण्यात आला होता’.

या अपघातानंतर त्याचा परिणाम आगामी चित्रिकरणातील थरारक दृश्यांमध्ये काही अडचणी येणार का? असे विचारले असता प्रियांका म्हणाली ‘नाही. काही दिवस मला दुखापतीचा त्रास होईलच. पण, त्याची काळजी घ्यावी लागेल. मी लवकरच पूर्वपदावर येइन’. दरम्यान, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ही ‘देसी गर्ल’ पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने तिच्या कामावर रुजु झाली आहे. ‘क्वांटिको’ या सिरीजची लोकप्रियता आणि प्रियांकाच्या नावाभोवती असणारे प्रसिद्धीचे वलय पाहता प्रियांका हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात नावाजली जात आहे. प्रियांकाने दुसऱ्यांदा हा अवॉर्ड मिळवला असून तिने या पुरस्कारासाठीच्या शर्यतीत अॅलेन पॉम्पेओ, केरी वॉशिंग्टन, ताराजी पी. हॅन्सन, विओला डेविस या अभिनेत्रींना मागे टाकले आहे. पीपल्स चॉईस अवॉर्ड्स २०१७ या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांकाला ‘फेव्हरिट ड्रामॅटिक टिव्ही अॅक्ट्रेस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

priyanka-chopra

हॉलिवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन सिरीजमध्ये व्यग्र असणारी प्रियांका चोप्रा सध्या निर्मिती क्षेत्रातही तिचे योगदान देत आहे. ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर प्रियांकाने पंजाबी भाषेतील चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्राही उरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामागोमाग आता प्रियांकाने पुन्हा एकदा तिचा मोर्चा मराठी चित्रपटाच्या निर्मितीकडे वळविला आहे. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.