आपल्या सामर्थ्यांची आणि सत्तेची गुर्मी एकदा चढली की माणसाचा ऱ्हासाचा प्रवास सुरू होतो. सत्तेचा संबंध जिथे जिथे येतो, तिथे तिथे हेच आणि असंच घडताना दिसतं. ‘मॅनेजमेंट मॅग्नेट’ म्हणून सुपरिचित असलेल्या मिहिर देशपांडे याचीही हीच समजूत होती, की आपण ‘किंग/क्वीनमेकर’ आहोत. आपल्या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रज्ञेद्वारे आपण कुणा ऐऱ्यागैऱ्यालाही एक यशस्वी उद्योगपती म्हणून घडवू शकतो. याचं जितंजागतं उदाहरण म्हणजे आपल्या ऑफिसात साधी एक्झिक्युटिव्ह असलेल्या नेहाला त्याने एक यशस्वी उद्योजिका बनवून दाखवलं होतं. अर्थात तत्पूर्वी त्याने तिच्याशी (स्वार्थापोटी) लग्नही केलं होतं! आपल्या इच्छित ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी सारे पाश, मोहमाया, भावभावनांचं जंजाळ त्यागून व्यावहारिक वृत्तीने मार्गक्रमणा केली तर हवं ते साध्य करता येतं, हे त्याचं जीवनाचं तत्त्वज्ञान! म्हणूनच नेहामधून एक यशस्वी उद्योजिका घडविण्यापूर्वी त्याने तिच्यासमोर काही शर्ती ठेवल्या होत्या. आपण लग्न केलं तरी मूल होऊ द्यायचं नाही. कारण मूल हे व्यक्तीच्या प्रगतीमधील अडथळा ठरतं. माणसाने मिळालेल्या यशात समाधान न मानता सतत पुढे पुढेच जायला हवं आणि सर्वोच्च शिखर गाठायला हवं. या प्रवासात येणारे कुठलेही अडथळे जाणीवपूर्वक.. प्रसंगी कठोर होऊन दूर सारता यायला हवेत, असं मिहिरचं यशामागचं तत्त्वज्ञान आहे. नेहा त्याने आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करून आज वर्षांला पन्नास कोटींची उलाढाल करणाऱ्या एका यशस्वी उद्योगाची मालकीण झाली होती. कॉर्पोरेट क्षेत्रात तिने स्वत:चं असं स्थान निर्माण केलं होतं. हे सगळं ती आपल्यामुळेच साध्य करू शकली, यात मिहिरला काडीमात्र शंका नव्हती. तो तसं चारचौघांत बोलूनही दाखवी. नेहाला आपल्या प्रगतीतलं त्याचं योगदान मान्यच होतं. पण याचबरोबर एक स्त्री म्हणून आपण मातृत्वही अनुभवायला हवं अशी तीव्र इच्छा अलीकडे तिच्या मनात अंकुरू लागली होती. तशात मिहिर-नेहाचा मित्र डॉ. राहुल यानेही तिच्या मनातल्या या सुप्त इच्छेला हवा दिली होती. परंतु मिहिरचा मात्र मूल होऊ देण्याला ठाम नकार होता. नेहाने भावनिकतेत वाहवत जाऊन आपल्या यशाच्या चढत्या आलेखावर पाणी फिरवू नये असं त्याचं ठाम मत होतं. नव्हे, तसं त्याचं फर्मानच होतं. लग्नापूर्वी नेहाने हे सगळं कबूल केलं होतं, याची आठवण तो तिला करून देतो.

उलटय़ा, मळमळ आदी लक्षणांच्या आधारे नेहाला दिवस गेले असावेत अशी शक्यता डॉ. राहुलने वर्तवताच मिहिर बिथरतो. तसं काही असल्यास ताबडतोब गर्भपात करून टाक असं तो नेहाला बजावतो. करिअर आणि मूल या दोन्ही गोष्टी स्त्री एकाच वेळी यशस्वीपणे हाताळू शकतो, हे ती त्याला परोपरीनं सांगू बघते. परंतु तो आपल्या भूमिकेवर ठाम असतो. शेवटी तिच्या संयमाचा बांध फुटतो आणि ती त्याला स्पष्टच विचारते, ‘मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर काय करशील?’ ‘मी तुझ्याशी घटस्फोट घेईन,’ असं तो थंडपणे सांगतो. एका साध्या संभाव्यतेवर इतक्या टोकाला जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यात आपलं कोणतं स्थान आहे, हे नेहाला कळून चुकतं. त्यामुळे तीच त्याच्यापासून वेगळं व्हायचं ठरवते. त्याच्या मार्गदर्शनाने सुरू केलेला उद्योग ती त्याला सुपूर्द करते आणि आपलं करिअर नव्यानं घडवण्याचा व मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेते.

मिहिरला तिच्या घर सोडून जाण्याने काहीच फरक पडत नाही. तो लगेचच त्याची स्वीय साहाय्यक असलेल्या हुशार, कामसू, प्रामाणिक आणि लाघवी स्वभावाच्या मीनलला लग्नाची मागणी घालतो. नेहा आपल्यापासून का वेगळी झाली, हेही तो तिला स्पष्टपणे सांगतो. तसंच संसारात न गुंतण्याच्या व मूल होऊ न देण्याच्या अटींवरच मीनलपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. मीनलचं एका तरुणाशी प्रेम जमलेलं असतं. ते लवकरच लग्न करणार असतात. परंतु मिहिरने दाखवलेलं यशस्वी उद्योजिका बनवण्याचं स्वप्न तिला भुरळ घालतं. आपल्या रटाळ, कनिष्ठ मध्यमवर्गीय आयुष्याचा तिला प्रचंड वीट आलेला असतो. ती त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारते.

काय होतं पुढे..?

नेहा मूल आणि करिअर या दोन्ही आघाडय़ा यशस्वीरीत्या निभावू शकते? मीनलने मिहिरची अट कनिष्ठ मध्यमवर्गीय आयुष्य बदलण्यासाठी मान्य केली असली तरी ती त्यावर ठाम राहते का? तिलाही मातृत्वाची ओढ खुणावत नाही? की यथाकाल मिहिरच्या विचारांत बदल होतो?..या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकातूनच मिळवणं उचित ठरेल.

लेखक रवी भगवते यांनी थोडंसं वेगळं कथाबीज नाटकासाठी निवडलं आहे. पण ते नवीन नाही. स्त्रीला निसर्गत:च मातृत्वाची ओढ असते, हे माहीत असताना मीनलने मिहिरशी का लग्न केलं? आयुष्यात यश, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सत्ता मिळाली की माणूस सुखी, समाधानी होतो? मग त्यापलीकडच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक समाधानाचं काय? की हे समाधान फक्त स्त्रीलाच हवं असतं, आणि पुरुषांना त्यांचं वावडं असतं? लौकिक यश, सत्ता आणि तिची नशा माणसाला सुखी करू शकते?.. अशा चिरंतन प्रश्नांना लेखकानं या नाटकाद्वारे हात घातला आहे. त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा माणसाला नाशाकडेच नेत असतो, हेही त्यांना दाखवायचं आहे. ‘क्वीनमेकर’मध्ये बेतलेपण नक्कीच आहे. नाटकातील विषयाची उकल करण्यासाठी लेखकाने पुरेपूर नाटय़ात्म स्वातंत्र्य घेतलेलं आहे. बुद्धिमान मिहिरच्या विचित्र, हेकेखोर वर्तणुकीचं समर्थन करण्यासाठी त्याच्या वडिलांच्या विक्षिप्त वागण्यावर लेखकानं बिल फाडलेलं आहे. अर्थात मेलोड्रामाचे घटक कथाबीजात असताना लेखकानं संयम पाळला आहे, हेही खरंच. त्यांनी काही गोष्टी नाटकात मुद्दाम ‘घडवून’ आणल्या आहेत. म्हणजे नेहाने आपल्या मुलीसह मिहिरच्या घरात मुद्दाम राहायला येणं, मीनलनं ते (मिहिरचा कडाडून विरोध असताना) उदार अंत:करणानं खपवून घेणं, वगैरे. हे सगळं घडवल्यावर नाटक मेलोड्रामाच्या नोटवर संपणार असंच वाटत असताना ते वास्तवदर्शी नोटवर संपतं, ही गोष्ट खचितच कौतुकास्पद होय.

दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी नाटकाची वीण घट्ट रचली आहे. मात्र, नाटकात राहुल या पात्राची गरज होती का, असा प्रश्न पडतो. तो वास्तव्याला आहे अमेरिकेत; पण लेखकाला हवं असेल तेव्हा तो मिहिरच्या घरी टपकतो. (राहुलनं अमेरिका-भारत विमान पास काढला होता की काय न कळे!) यातली मीनल ही मुलगी इतकी गोड, सभ्य, सुसंस्कृत आहे, की ती निव्वळ पैशांसाठी मिहिरच्या भीषण अटी मान्य करून त्याच्याशी लग्न करेल आणि आपल्या प्रियकराला सहज डच्चू देईल, हे पचणं चांगलंच अवघड जातं. ती  ओव्हरस्मार्ट असती तर ते धकून गेलं असतं. दुसरं म्हणजे ती जेव्हा मिहिरला सुनावते, की ‘मीही तुझा गिनी पिग म्हणून वापर केलाय..’ तेव्हा तो कुठल्या अर्थानं, हे स्पष्ट होत नाही. इतरांचा ‘वापर’ करणारी माणसं धूर्त, आपमतलबी व प्रचंड निष्ठुर असतात. पण मीनल हे वाक्य मिहिरला सुनावत असताना चक्क रडत असते! असो. या अशा काही त्रुटींचा दिग्दर्शकानं विचार करावा. बाकी प्रयोग उत्तमच होतो.

प्रदीप मुळये यांनी मिहिरचं आलिशान, टीपटीप  घर उत्तम उभं केलं आहे. सर्जक प्रकाशयोजनेतून राजन ताम्हाणे यांनी मिहिरचं आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समधलं लाइव्ह भाषण स्वीकारार्ह केलं आहे. परीक्षित भातखंडेंनी पाश्र्वसंगीतातून नाटय़ांतर्गत संघर्ष आणखी धारदार बनवला आहे. कुहू नागेश भोसले यांनी वेशभूषेतून पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ बहाल केलं आहे.

अक्षर कोठारी यांनी अत्यंत बुद्धिमान, परंतु एककल्ली, निष्ठुर, भावनाविहीन ‘मॅनेजमेंट मॅग्नेट’ मिहिर कमालीच्या एकारलेपणासह प्रत्ययकारीतेनं साकारला आहे. त्यांची थंड शब्दफेक मिहिरच्या शुष्क, कोरडय़ा व्यक्तिमत्त्वाचं व्यक्त होण्याचं शस्त्र म्हणून त्यांनी हेतुत: वापरलं आहे. शीतल क्षीरसागर यांनी कॉर्पोरेट वुमनचा स्मार्टनेस आणि मातृत्वाची स्त्रीसुलभ ओढ या दोन्ही गोष्टी उत्कटतेनं व्यक्त केल्या आहेत. मीनलच्या भूमिकेत अंकिता पनवेलकर नको इतक्या लोभस दिसल्या, वागल्या आणि वावरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मिहिरसोबतचा अटळ भावनिक संघर्ष समर्थनीय असला तरी त्याला संहितेचं भक्कम पाठबळ लाभलेलं नाही. अमित गुहे यांचा राहुल स्मार्ट आहे. इलिना शेंडे या मुलीने परीचं काम समजून उमजून केलं आहे.