बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पार्च्ड’ सिनेमातील तिची बोल्ड दृश्येही बरीच गाजली होती. त्यानंतर आता राधिका पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिचे एक ‘हॉट’ फोटोशूट यासाठी निमित्त ठरले आहे. या फोटोशूटमधील छायाचित्रांमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे राधिकाने हे फोटोशूट कोणत्याही स्टुडिओमध्ये न करता स्वत:च्या घरात केले आहे. तिने ही छायाचित्रे स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत.

राधिकाचा बोल्डपणा हे तिच्या लोकप्रियतेमागील एक कारण असले तरी समीक्षकांनी वेळोवेळी तिच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे. यापूर्वी ‘कबाली’ सिनेमात राधिकाने रजनीकांतच्या पत्नीची भूमिका साकारली होती. रजनीकांत यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव खूपच उत्कृष्ट असल्याचे तिने म्हटले होते.

आतापर्यंत रजनीकांत यांच्यासोबत ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण आणि सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रींनी काम केले आहे. रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याबाबत राधिका म्हणाली की, ‘खरं सांगायचं तर आम्हा दोघांनाही कधी मध्यस्थीची गरज लागली नाही. कबालीचे दिग्दर्शक रंजीतने मला फोन करून कबालीमध्ये काम करण्याबाबत विचारले होते. त्यांनी मला सिनेमाची कथा ऐकण्यासाठी चेन्नईमध्ये बोलावले. जेव्हा मला माझ्या भूमिकेबद्दल कळले तेव्हा मी लगेच होकार दिला. कारण आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मला गमवायची नव्हती.’