भारतातील प्रमुख रेडिओ वाहिनीतर्फे ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अनोख्या सांगितीक मैफलीच्या नवव्या सत्रात देशभरातून मोठ्या संख्येत स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे एका अर्थी या स्पर्धेमुळे संगीत कलेशी निगडीत स्पर्धांचा स्तर उंचावला आहे असंच म्हणावं लागेल.

या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यामध्ये प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तनिष्क बागचीच्या हस्ते विजेत्यांना १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ११ अतिरिक्त रेडिओ स्टेशनवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ३९ शहरांतील होतकरु गायकांनी सहभाग घेतला. मुख्य म्हणजे संपूर्ण देशातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई शहारातून सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संख्या वाढली आहे. मुंबईच्या या स्पर्धकांचा आकडा तब्बल २७,७८९ ने वाढला आहे.

‘रग रग मे दौडे सिटी’ या ब्रीदवाक्यासह प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या रेडिओ वाहिनीप्रती लोकांनी त्यांचा विश्वास व्यक्त करत स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. मुंबईमधून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उदयोन्मुख कलाकारांचा असा सहभाग पाहता, सध्याच्या पिढीमध्येही या कलेविषयी आतुरता असल्याचं स्पष्ट झालंय.

या अनोख्या उपक्रमाबाबत बोलताना तनिष्क बागचीनेही त्याचं मत मांडलं, ‘संगीत हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, या अनोख्या उपक्रमात मला स्पर्धकांची गुणवत्ता ओळखण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.’

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

जवळपास तीन आठवडे चाललेल्या या स्पर्धेत श्रेयक, श्रीजित, नितीन यांच्यासह आणखी दोन स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या अनोख्या स्पर्धेत स्पर्धकांना रेडिओ सिटीच्या माध्यमातून आपला आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचवत त्यांची मते मिळवण्याची संधीही मिळाली होती. या स्पर्धकांचे सुरेल आवाज ऐकून श्रोतेमंडळींनाही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. स्थानिक आणि होतकरु गायकांना त्यांच्या कलेची जाण करून देत त्यांची ही कला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेची आखणी करण्यात आली आहे.