शाहरूख खान याच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहरूखच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर तो रिलीज झाला आहे. राहुल ढोलकीया याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रितेश सिधवानी, फराहान अख्तर आणि गौरी खान यांनी या शाहरूख खान, माहिरा खान आणि नवाझुद्दीन सिद्धीकी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अब्दुल लतिफ या गुन्हेगाराच्या आयुष्यावर आधारित ही कथा असून यात शाहरूखचा लूकही हटके बघायला मिळणार आहे.

शाहरूख खान याच्या ‘रईस’मध्ये पाकिस्तानी माहिरा खान असून त्यावरून वाद पेटला होता. मनसेने पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडतो की, त्यांना याचा फटका बसतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.  करण जोहरच्या ‘ऎ दिल है मुश्कील’ या चित्रपटाचे या वादामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ट्विटर आणि सोशल मीडियावर सर्वत्रच ‘रईस’ या चित्रपटाचीच चर्चा सुरु असताना सरतेशेवटी या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या दिमाखात प्रेक्षकांच्या भेटीला आला. देशातील जवळपास ३५०० चित्रपटगृहांमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसोबत थेट संवाद साधत शाहरुख खानने हा ट्रेलर प्रदर्शित केला.

‘अम्मीजान कहती थी कोई धंदा छोटा नही होता…और धंदे से बडा कोई धर्म नही होता’ या वजनदार वाक्याने या ट्रेलरची सुरुवात होत आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या काही अशा हालचाली दिसून येतात की, गुंडाची भूमिका करतानाही त्याच्या हळव्या मनाचे दर्शन घडून येते. गुंडाच्या भूमिकेत असणारा शाहरुख हळव्या मनाचा असल्याचे ट्रेलरमधील काही क्षणामध्ये दिसत असल्यामुळे या चित्रपटात गुंडामधील भावूक शाहरुख पाहायला मिळेल का असा प्रश्नही निर्माण होतो.  या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली थरारक दृश्ये, शाहरुखचा हटके, गॅंगस्टर लूक आणि त्याते डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आलेले पार्श्वसंगीत आणि कलाकारांचे संवाद पाहता या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असणार. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीच्या अभिनयाची झलकही पाहायला मिळत आहे. यासोबतच मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीही या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. त्यामुळे किंग खानचा ‘रईस’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होणार असंच दिसतंय.