गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चा आहे ती केवळ आणि केवळ सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाची. अखेर हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. १५ जुलैपासून तिकीटांची विक्री करण्यात आलेल्या या चित्रपटाचे पहिल्या तीन दिवसांचे सर्व शो पूर्ण भरले आहेत. रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्याच इतकी आहे की आता तिकीटेसुद्धा कमी पडू लागली आहेत. चाहते कबालीच्या तिकीटाची मागणी धरून असतानाच चित्रपटगृहांचे मालक मात्र एका व्यक्तीच्या मागे लागले आहेत. ती व्यक्ती म्हणजे बीएमटीसीचे ७१ वर्षीय निवृत्त बस चालक पी राज बहादुर.
रजनीकांत यांचा कबाली हा चित्रपट त्यांच्या कुटुंबाने आणि बहादुर यांनी आपल्या चित्रटपगृहात पाहावा अशी चित्रपटगृहांच्या मालकांची इच्छा आहे. रजनीकांत यांच्या कुटुंबाला चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रीत करण्याचे वेड तर समजू शकतो. पण हे पी राज बहादुर कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार असा नावलौकिक असलेले रजनीकांत हे पूर्वी बस कनडक्टर होते हे सर्वांनाच माहित आहे. १९७० सालापासून तीन वर्षे  ते ज्या बसमध्ये कनडक्टर म्हणून कार्यरत होते त्या बसचे बहादुर हे चालक होते. तेव्हापासून झालेली बहादुर आणि रजनीकांत यांची मैत्री तशीच कायम आहे. पी बहादुर यांनी एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही ज्यावेळी एकत्र काम करत होते तेव्हा सकाळी ६ ते दुपारी २ दरम्यान श्रीनगर ते केम्पेगोवाडा दरम्यान बसच्या आठ फे-या मारायचो. दरम्यान, कनडक्टर म्हणून काम करत असतानाच तो नाटकांमध्येही अप्रतिम काम करत होता. त्याची अभिनयक्षमता पाहून मी त्याला अभिनयाचे अधिक चांगले धडे घेण्यासाठी उद्युक्त केले.
आगामी कबाली पाहण्याविषयी विचारले असता हा चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात पाहणार हे अद्याप ठरवले नसल्याचे ते म्हणाले. चित्रपटगृहांचे मालक मी त्यांच्या इथे येऊन हा चित्रपट पाहावा म्हणून मागे लागले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की  मी जर त्यांच्या चित्रपटगृहात कबाली पाहिला तर खुद्द रजनीकांतच तेथे आल्याचे त्यांना वाटेल. मला पहिल्याच दिवशी जाऊन हा चित्रपट पाहायचाय आणि चित्रपटाबाबतचे माझे मत रजनीकांतला फोन करून कळावयचे आहे. तो प्रत्येक चित्रपटानंतर माझी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्याकूळ असतो, असेही बहादूर म्हणाले.