रजनीकांत यांच्याबद्दल काय म्हणायचे? त्यांची स्तुती आणि प्रसिद्धीचे साधे वर्णन जरी करायचे झाले तर शब्द कमी पडतील असेच आपल्याला वाटू लागेल. जगात फार कमी अभिनेते असतील ज्यांना इतकी प्रसिद्धी लाभली असेल.आता हेच बघा ना ट्विटरवर फारसे कार्यरत नसणा-या रजनीकांत यांचे ट्विटरवर ३ दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर फार कमी प्रमाणात ते कार्यरत असतात.
२०१३ पासून ट्विटरवर अकाउंट असलेल्या रजनीकांत यांनी आतापर्यंत फक्त २९ ट्विट केले आहेत. बॉलीवूड असो की हॉलीवूड प्रत्येक अभिनेता ट्विटरवर अॅक्टिव्ह असतो. दर दिवशी त्यांचे काहींना काही ट्विट सुरुच असते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळते पण रजनीकांत हे फारसे अॅक्टीव्ह नसले तरी ट्विटरवर इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे फॉलोवर पाहता त्यांची चाहत्यांवर किती जादू आहे हे समजू शकते. आकाशात जितके तारे नसतील तितके रजनीकांत यांचे चाहते आहेत अशा प्रकारचे जोक्स सोशल मीडियावर फिरत होते.
नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा आणि जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या तेव्हा रजनीकांत यांनी ट्विट केले होते. त्यांचे पहिले वहिले ट्विट त्यावेळी १५ हजारवेळा रिट्विट करण्यात आले होते. आतापर्यंत आभार मानण्यासाठीच रजनीकांत यांनी आपले ट्विटर अकाउंट हाताळले आहे. ट्विटरवर फारसे कार्यरत नसलेल्या अभिनेत्यांपैकी रजनीकांत एक आहे. असे असले तरी त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
दक्षिणेकडील त्यांचे चाहते तर त्याची देवाप्रमाणे पूजा करतात. त्यांच्या छायाचित्रावर कोण दुग्धाभिषेक करतो तर कोण त्यांचा सर्वात उंच पुतळा उभारतो. आता तर त्यांचा कबाली चित्रपट प्रदर्शित होणार म्हणून दक्षिणेतल्या अनेक कार्यालयांनी सुट्टीच जाहिर करून टाकली आहे.