एका आवास योजनेच्या उदघाटनासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या रजनीकांत यांनी तामिळ संघटनांच्या तीव्र विरोधांमुळे आपला दौरा रद्द केला होता. पण आता रजनीकांत यांनी श्रीलंकेतील तामिळ लोकांना एक पत्र लिहिले आहे. ‘चांगल्या गोष्टी घडत राहो. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा आपण नक्कीच भेटू. मी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन,’ असे पत्र रजनीकांत यांनी श्रीलंकेतील तामिळ रहिवाशांना पाठवले.

आवास योजनेच्या उदघाटनासाठी रजनीकांत श्रीलंका दौऱ्यावर जाण्याचे जवळपास नक्कीच झाले होते. पण, काही तामिळ संघटनांनी रजनीकांत यांना श्रीलंकेच्या दौऱ्याबाबत फेरविचार करण्याची विनंती केली होती. त्यामुळे रजनीकांत यांनी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन शेवटी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

सुरुवातीला ९ एप्रिल रोजी रजनीकांत दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार होते. या ठिकाणी ते १५० हून अधिक विस्थापित तामिळी लोकांच्या घरकुलांचे उदघाटन करणार होते. पण जर ते श्रीलंकेला गेले तर मोठ्या प्रमाणात स्थानिक तामिळ समुदाय नाराज होऊ शकतो, असा सल्ला लिबरेशन पॅन्थर पार्टी म्हणजेच विदुथालाई तिरुथैगल काचीच्या (वीसीके) कार्यकर्त्यांनी रजनीकांत यांना दिला होता. याचा विचार करुनच त्यांनी श्रीलंकेचा दौरा रद्द केला होता.

सन २००९ पासून विस्थापित तामिळ लोकांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. ते रजनीकांत यांचा वापर करून जगाला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही रजनीकांत यांना त्यांच्या दौऱ्याबाबत फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता, असे वीसीकेने स्पष्ट केले.