दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना लोक देवाच्या ठिकाणी का मानतात याचा प्रत्यय पुन्हा आला आहे.  रजनीकांत यांनी पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये दक्षिण भारतीय नद्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी ‘किसान एसोच’चे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांत यांनी नद्यांना जोडण्यासाठी एक कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.

वाचा : .. अन् सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा

रजनीकांत यांनी रविवारी पी. अय्यकन्नू यांच्या नेतृत्त्वाखालील १६ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नदीजोड प्रकल्पाला पाठिंबा देत एक कोटी रुपयांची मदत देणार असल्याचं जाहीर केलं. शिवाय या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्त्व करण्याचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊ, असंही रजनीकांत यांनी सांगितलं. दरम्यान, रजनीकांत यांनी नदीजोड प्रकल्पासाठी देऊ केलेला निधी त्यांनी पंतप्रधानांकडे सुपूर्द करावा, अशी विनंती अय्याकन्नू यांनी केली आहे.

वाचा : कपिलविरोधात सुनिल देणार कृष्णा अभिषेकला साथ?

नदीजोड प्रकल्पानंतर दक्षिणेतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात महानदी, गोदावरी, कृष्णा, पालारु आणि कावेरी या नद्या जोडणं आवश्यक असल्याचं मतही रजनीकांत यांनी व्यक्त केलं. मागील काही दिवसांपासून रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याचे संकेत येत होते. रजनीकांत यांनी शेतकऱ्यांची घेतलेली भेट हे देखील राजकारणाशी जोडलं जात आहे. तमिळनाडूच्या अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. तेथे मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर वातावरण तापलं आहे.