दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांशी नुकताच तामिळनाडू येथे संवाद साधला. आपल्या देवालाच प्रत्यक्ष समोर पाहून अनेक चाहते भावूक झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता तो म्हणजे ‘थलैवा’ राजकारणात कधी प्रवेश करणार? हा प्रश्न त्यांना विचारण्यातही आला. यावर उत्तर देताना रजनीकांत यांनी काहीसा होकार दिला नाही आणि नकारही… ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रजनीकांत म्हणाले की, ‘सध्या माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. काही कामं आहेत. तुमच्याबाबतीतही तसंच आहे. पण जेव्हा अटीतटीची वेळ येईल तेव्हा सर्वांनाच कळेल.’

तामिळनाडूच्या कोदमबक्कम परिसरात रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांची भेट घेतली. सुमारे आठ वर्षांनी हा सुपरस्टार चाहत्यांसोबत बोलत होता. ते पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांशी असाच संवाद साधणार आहेत. पण त्याचं वेळापत्रक त्यांनी अजून तयार झालेलं नाही. आपल्या तामिळ कनेक्शनबद्दल बोलताना रजनीकांत म्हणाले की, ‘माझ्या चाहत्यांनी मला ‘तामिझन’ बनवले. आयुष्याची २३ वर्षे मी कन्नडिगा होतो. पण, गेल्या ४४ वर्षांपासून मी तामिझन आहे. हे तुमच्यासारख्या चाहत्यांमुळेच शक्य झाले.’ रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला तर ते सर्वात मोठे विनाशक असेल, असे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. याशिवाय शिवाजीराव गायकवाड म्हणजेच रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झालेला असल्यामुळे ते परप्रांतीय आहेत, असा आरोपही सुब्रमण्यम यांनी रजनीकांत यांच्यावर केला होता.

‘सध्या माझा राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही. माझं आयुष्य देवाच्या हातात आहे. त्याने भविष्यात माझ्यासाठी काय लिहून ठेवलंय ते कोणालाच माहिती नाही. पण त्याने माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. म्हणून जर मी भविष्यात राजकारणात आलो नाही तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका.’, असे रजनीकांत यांनी म्हटले. तसेच २१ वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाला पाठिंबा देऊन चूक केली होती, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे रजनीकांत भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करणार की ते स्वतःचा पक्ष काढणार याकडे नक्कीच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं असेल.