दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालविणारे सुपरस्टार रजनीकांत येत्या सोमवारी ६६ वर्षांचे होतील. मात्र, आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन रजनीकांत यांनी चाहत्यांना केले आहे.

रजनीकांत यांचे मॅनेजर रिआज अहमद यांनी ट्विटरवर ट्विट करून यासंबंधी माहिती दिली. रिआज अहमद यांनी ट्विट केले की, रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करू नका अशी विनंती केली आहे. तसेच, रजनीकांत यांचे पोस्टर्स आणि बॅनर्सही लावू नका असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात निधन झाले. त्यामुळेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याचे कळते. रजनीकांत यांनी ट्विटरवरून अम्मांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यांनी म्हटलेले की, केवळ राज्यानेच नाही तर संपूर्ण देशाने एका शूर कन्येला गमावले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. जयललिता यांच्या पोज गार्डन भागातील निवासस्थानाजवळच रजनीकांत यांचे निवासस्थान आहे.

गेल्यावर्षीही रजनीकांत यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. गेल्यावर्षी तामिळनाडूला पुराचा तडाखा बसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले होते. त्यावेळी रजनीकांत यांनी चाहत्यांना आपला मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले होते. तसेच, आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सध्या राज्याला मदत करणे जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांचे मत मांडले होते.

थलैवा स्टार रजनीकांत यांच्या कामाच बोलायचं झालं तर ते आता शंकर याच्या २.० चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. तसेच, आमिरच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा आगामी दंगल चित्रपटात रजनीकांत यांनी आमिरच्या व्यक्तिरेखेला तामिळमध्ये आवाज देण्यास नकार दिल्याचेही समजते. मिळालेल्या माहितीनुसार, खुद्द आमिरनेच रजनीकांत यांना डबसाठी विचारणा केली होती. रजनीकांत यांच्या जवळच्या सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला माहिती दिली की, आमिरने रजनीकांत यांच्यासाठी दंगल चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. त्यावेळी त्याने दंगल चित्रपटाचे तामिळमध्ये डब करण्यासाठी रजनीकांत यांना विचारणा केली. रजनीकांत यांना हा चित्रपट खूप आवडला. पण त्यांनी नम्रपणे चित्रपटास डब करण्यास नकार दिला.