रजनीकांत सिर्फ नाम ही काफी है.. असेच आता रजनीकांत यांच्या चित्रपटांसाठी म्हणायला हवे. २०१४ मध्ये आलेल्या ‘लिंगा’नंतर रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात प्रदर्शित झाला.  ‘कबाली’च्या निमित्ताने चित्रपट प्रदर्शनाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच मुंबईत सकाळी सहा वाजल्यापासून खेळ सुरू झाला आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांनी पहिल्या खेळाला अभुतपूर्व गर्दी करून आपले ‘रजनी’प्रेम दाखवून दिले. माटुंग्यातील अरोरा टॉकीजमध्ये या चित्रपटाच्या सकाळी सहा वाजता झालेल्या पहिल्या शोला इतिहासात पहिल्यांदाच हाऊसफुल्ल गर्दी होती. रजनीकांत यांच्या चाहत्यांमुळे गेले काही दिवस भारत ‘कबाली’मय झाल्याचे चित्र आहे. ‘कबाली’ची प्रसिद्धी आणि रजनीकांत यांचे चाहते यामुळे पहिल्या दिवशी सर्व चित्रपटगृहातील खेळ ‘हाऊसफुल्ल’ होते.
दरम्यान, केवळ भारतातचं नाही तर मलेशिया, अमेरिका आणि ज्या देशांमध्ये ब-यापैकी तामिळ नागरिक राहतात तेथे कबालीचे शो दाखविण्यात येत आहेत. तब्बल १२०० स्क्रिन्सवर कबाली प्रदर्शित झाला आहे. दक्षिण भारतात तर चित्रपटाच्या तिकिटांची विक्रमी विक्री झाली. समीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी ३५ कोटींच्या वर तिकीटांची विक्री झाली आहे. समीक्षक तरण आदर्श यांनीही कबालीच्या बक्कळ कमाईविषयी ट्विट केले आहे. या चित्रपटाने सेटलाइट राइट्सच्या माध्यमातून आधीच २०० कोटींचा गल्ला जमविल्याचे म्हटले जातेय. त्याचसोबत कबालीने अमेरिकेत सर्वाधिक तिकीट विक्रीचा विक्रमही केला आहे. याचा अर्थ बाहुबली आणि सुलतानचा एक रेकॉर्ड तर तुटलाच आहे.