सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाने पहिल्या दिवशी २५० कोटींचा गल्ला कमविल्याचा दावा चित्रपट निर्मात्यांनी केला आहे. बहुप्रतिक्षित असा कबाली शुक्रवारी जगभरात प्रदर्शित करण्यात आला. शनिवारी या चित्रपटाचे दक्षिण भारतात ९० टक्के शो भरले तर याच्या हिंदी डब चित्रपटाचे ५० टक्के शो भरले होते.
पहिल्या दिवशी ४२ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांत १२० कोटी इतकी कमाई करण्याकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाने शुक्रवारी तामिळनाडूमध्ये २१.५ कोटींची कमाई केली होती. तामिळनाडूतील हा आतापर्यंत सर्वात मोठा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड आहे. सलमान खानच्या सुलतान या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई केली होती. पण, चित्रपटाचे निर्माते एस थानु यांच्या वक्तव्याने आता सर्वांना धक्का बसला आहे. कबालीने पहिल्या दिवशी २५० कोटी कमविल्याचा दावा थानु यांनी केला आहे. कबालीच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी २५० कोटी कमविले आहेत. ज्यात केवळ तामिळनाडूतूनचं तब्बल १०० कोटींचा गल्ला जमला असून भारतातील इतर भागातून १५० कोटी कमविल्याचे त्यांनी सांगितले.
कबालीच्या तिकीटाची किंमत तामिळनाडूत केवळ १२० रुपये इतकी असल्याने या चित्रपटाने केलेली कमाई खरंच विलक्षण आहे. तुलनेत सलमानच्या सुलतान चित्रपटाची तिकीट ही ३५० ते ४०० रुपये इतकी होती. हा चित्रपट ४५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. तर रजनीकांत यांचा कबाली हा सुलतानपेक्षा दुप्पट स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलाय. ही गणित पाहता सुपरस्टार केवळ एकच आहे आणि तो म्हणजे रजनीकांत असे म्हणायला हरकत नाही.