निर्माते सूरज बडजात्यांचे चुलत भाऊ रजत यांचे शुक्रवारी मुंबईमध्ये कर्करोगामुळे निधन झाले. गेले काही दिवस ते जसलोक रुग्णालयात दाखल होते.
रजत ‘राजश्री मीडिया’चे व्यवस्थापकीय संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रजत यांना रक्ताचा कर्करोग होता.
आज वरळीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रजतच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. ‘राजश्री प्रोडक्शन’ची सुरुवात रजत आणि सूरज यांचे आजोबा ताराचंद बडजात्या यांनी केली होती. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमाच्या यशात रजत यांचा मोठा वाटा होता. या सिनेमाचं डिजिटल कॅम्पेन करण्याची कल्पना रजत यांची होती.
रजत यांच्या अकाली मृत्यूमुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अभिनेता सलमान खान, बोमन ईरानी, रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय अभिनेत्री रिचा चड्ढा यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला.