नोटाबंदी हा सध्या देशात चर्चेचा विषय आहे. गेल्या महिन्यात आपण अनेकांना बँक आणि एटीएमबाहेर रांगेत उभे राहिलेले पाहिले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड तसेच टीव्ही कलाकार देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसले. याचपार्श्वभूमीवर विनोदी कलाकार आणि भाजप नेता राजू श्रीवास्तव आपल्या शैलीत व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसापूर्वीच राजू श्रीवास्तव एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात राजू श्रीवास्तवने नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. नोटाबंदीवर गंमत करताना अभिनेता दिलीप कुमार आणि राज कुमार यांची मिमिक्रि करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे.

काळ्या पैसा दुसऱ्याच्या खात्यामध्ये जमा करुन पांढरा पैसा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी राजू श्रीवास्तव याने विनोदी अंगाने समाचार घेतला. काळ्या पैसा वैध करणाऱ्यांसाठी मोदी कशा प्रकारे कारवाई करतील, हा अंदाज त्याने राजकुमार आणि दिलिप कुमार यांच्या आवाजात दाखवून देताना दिसला. या कार्यक्रमामध्ये राजू श्रीवास्तवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ गाणे देखील गायले. सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीनंतर आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ करणाऱ्या पंतप्रधानांच्या मनात कोणते गाणे सुरु असेल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न देखील श्रीवास्तवने या कार्यक्रमात केला. अडीच वर्षे सरकारने उत्तम काम केल्याचा संदेश देखील श्रीवास्तवने या व्यासपीठावरून दिला.

नोटाबंदीच्या निर्णयावर विनोद करताना राजू श्रीवास्तवने थंडीच्या दिवसांची नोटाबंदीसोबत सांगड घालण्याचा अजब प्रकार देखील सादर केला. भल्या- भल्यांकडील नोटांच्या कमतरतेमुळे यंदा अधिक थंडी पडणार असल्याचा टोमणा मारत त्याने काळा पैसा बाळगणाऱ्यांना अधिक थंडीची जाणीव होईल, असे आशयाची विधाने केली.