अभिनेत्री कंगना आणि हृतिक रोशनचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाही. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने हृतिक, आदित्य पांचोली यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर या वादाची रोजच चर्चा होऊ लागली. एकीकडे आदित्य पांचोलीने तिला मानहानीची नोटीस पाठवली असतानाच हृतिकने गेल्या वर्षी तिच्याविरोधात दाखल केलेली २९ पानांची तक्रार प्रसारमाध्यमांमध्ये समोर आली. या सर्व वादावर आता हृतिकचे वडील दिग्दर्शक राकेश रोशन यांनी कंगनावर टीका करत आपली बाजू मांडली आहे.

‘डीएनए’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन म्हणाले की, ‘कोणत्याही तथ्यहीन आरोपांवर आमचा विश्वास नाही. सर्व पुराव्यांसह आम्ही तक्रार दाखल केली आहे. ८ एप्रिल २०१७ रोजी सायबर क्राइम ब्रांचकडे आम्ही आमच्या बाजूने सर्व सत्य मांडलं. संबंधित कागदपत्रं, इमेल्सचे पुरावे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणंही त्यांना दिली. कोण खरं बोलतंय, हे आता तेच ठरवतील. माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रामाणिक राहण्यास शिकवलं आणि हृतिकलाही मी हिच शिकवण दिली.’

वाचा : सोनमच्याच वाटेवर चालू लागली अनुष्का

‘रिपब्लिक टीव्ही’ या टेलिव्हिजन वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हृतिकने कंगनावर आपला पाठलाग करण्याचे आणि अश्लील मेसेज पाठवण्याचे आरोप लावले होते. कंगनाच्या नंबरवरुनच हे मेसेज पाठवण्यात आले असल्याचे आरोप करत हृतिकने गेल्या वर्षी तिच्याविरोधात २९ पानांची तक्रार दाखल केल्याचंही म्हटलं होतं. त्या तक्रारीचा पुरावाही त्या वाहिनीने सादर केला होता.