वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. रामगोपाल वर्मा औरंगाबाद दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

औरंगाबाद येथे राहणाऱ्या मुस्ताक मोहसिन नावाच्या व्यक्तीने २००९ मध्ये आलेल्या ‘अज्ञात’ सिनेमाची मुळ कथा त्याची असल्याचा दावा केला होता. वर्मा यांनी सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना कथेचे श्रेय दिले होते. ‘मी ही कथा राम गोपालला पाठवली होती. नंतर त्यांचे काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर बनवला असल्याचे मला समजले.

त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली’ असे मोहसिनने म्हटले आहे. मी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली. न्यायालयाने दोघांनाही समन्स पाठवले. आम्ही दोन वर्षे त्यांच्या उत्तरासाठी थांबलो, त्यानंतर न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली. पण उत्तर न आल्याने शेवटी न्यायालयाने आता अजामीनमात्र वॉरंट जारी केल्याचे मोहसिनने सांगितले. या प्रकरणाबाबत राम गोपाल वर्माशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, नेहमीच ट्विटरवरून आक्षेपार्ह बोलणाऱ्या रामूने दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देण्यापेक्षा के. विश्वनाथ यांच्या नावे दादासाहेब फाळकेंना पुरस्कार द्यायला हवा होता असं रामूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं होतं.