गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्याच्या चित्रपटांपेक्षा ट्विटरवरील वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळालेय. पण, आता यापुढे असे होणार नाही. कारण स्वतः रामूने ट्विटरच्या मायाजालातून काढता पाय घेतला आहे. गेल्या शनिवारी शेवटचे ट्विट करून राम गोपाल वर्माने तो ट्विटर अकाऊंट बंद करत असल्याचे सांगितले. यापुढे तो केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येऊ शकणाऱ्या इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

२७ मे २००९ मध्ये रामूने ट्विटवर सक्रिय राहण्यास सुरुवात केली होती. आपल्या वाचाळ ट्विटसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दिग्दर्शकाने ट्विटवरून काढता पाय घेण्यामागचे कारण मात्र सांगितले नाही. ‘मी ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. गेल्या काही वर्षांपासून मला फॉलो करणाऱ्यांचा मी आभारी नाही,’ असे त्याने ट्विट केले. यापुढे मी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टाग्रामद्वारे तुमच्याशी संवाद साधेन, असेही त्याने म्हटलेय. शेवटच्या ट्विटमध्ये त्याने लिहिलंय की, ‘ट्विटरवरील माझ्या मृत्यूपूर्वी माझे शेवटचे ट्विट….. यापुढे मी आरजीव्ही झूमइनवर मन लावून काम करणार आहे. जन्म २७.०५.२००९ मृत्यू २७.०५.२०१७’

rgv-tweet

टायगर श्रॉफ, सनी लिओनी, श्रीदेवी यांसह कितीतरी सेलिब्रिटींवर रामूने ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. यामुळे तो कायद्याच्या कचाट्यातही सापडला होता. नेहमी बिंधास्तपणे आपले मत मांडणाऱ्या रामूने अचानक काहीही कारण न देता ट्विटर अकाऊंट बंद केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ट्विटरला राम राम ठोकणाऱ्यांमध्ये राम गोपाल वर्मा हा सध्या नवीन बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. याआधी गायक सोनू निगमने त्याचे ट्विटर अकाऊंट बंद केले. ट्विटरवर एकाच बाजूने होणाऱ्या चर्चांच्या विरोधात आपण असल्याचे म्हणत त्याने यापुढे ट्विटरवर न राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा मित्र आणि गायक अभिजीत भट्टाचार्यने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील पदाधिकारी शीला रशिद यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानंतर ट्विटरने त्याचे अकाऊंट सस्पेंड (बंद) केले. त्यामुळे या गोष्टीच्या निषेधार्थ सोनू निगमही ट्विटरच्या दुनियेतून बाहेर पडला.