बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिका आजही अजरामर आहेत. ते प्रत्येक भूमिकेत स्वतःची अशी छाप सोडतात की त्यांच्याशिवाय ती भूमिका दुसरं कोणी साकारूच शकत नाही असा विचार अनेकांच्या मनात येतो.
त्यांच्या अशाच काही गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे ‘सरकार’ अर्थात सुभाष नागरे. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘अॅंग्रियर दॅन एव्हर’ असं म्हणत या ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ साकारत असलेल्या सरकारची ओळख होत आहे.

राजकारण, त्यात उडणारे खटके आणि त्यानंतर सूडाच्या भावनेने होणारे मतभेद आणि कावेबाजपणा या साऱ्याची झलक ‘सरकार ३’च्या ट्रेलरमधून पाहायला मिळते. रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठक, यामी गौतम यांचा अभिनयही अनेकांचे लक्ष वेधत आहे. ट्रेलरमधील दृश्य आणि संवाद पाहता राम गोपाल वर्माने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळतंय. ‘लाखो लोग अगर सरकार के फॅन्स है तो सौ देडसो तो दुश्मन भी होंगे’, असं म्हणत सरकार म्हणजेच सुभाष नागरेच्या विरोधात उभे ठाकणारे त्यांचे विरोधक आणि त्यांचा एकंदर कावेबाजपणा पाहता ‘सरकार ३’ मधून अॅक्शन, राजकारण आणि नात्यांमधील बंध यावर नव्या पद्धतीने प्रकाशझोत टाकण्यात येणार असंच दिसतंय. अभिनेता अमित सध या चित्रपटातून सुभाष नागरेच्या नातवाच्या भूमिकेत दिसत आहे. एका राजकारणी कुटुंबातील व्यक्तीचा रुबाब आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून झळकणारं राजकारण अमितच्या अभिनयातून पाहायला मिळतं. ट्रेलरमधील पार्श्वसंगीतामुळे ट्रेलरला ‘चार चाँद’ लागत आहेत.

‘सरकार ३’ मध्ये मनोज बाजपेयी, जॅकी श्रॉफ आणि रोनित रॉय कलाकारांचाही सहभाग आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनची अनुपस्थिती भासत असली तरीही भिंतीवर टांगलेला त्याचा फोटो आणि चित्रपटाच्या याआधीच्या भागामध्ये त्याने साकारलेल्या प्रभावी भूमिकेच्या बळावर तोसुद्धा या चित्रपटाचा एक भाग आहे हे नाकारता येणार नाही. राहुल मित्रा आणि आनंद पंडित यांची निर्मिती आणि राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा चित्रपट मे महिन्याच्या १२ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.