मृणाल देव-कुलकर्णीसारख्या समंजस, समर्थ अभिनेत्रीने जेव्हा ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’सारख्या वेगळ्या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केलं तेव्हा एका यशस्वी आणि हुशार अभिनेत्रीचं हे पुढचं पाऊल म्हणून त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं जाणं हे साहजिकच होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. आता मृणाल पुढे काय नवं देणार, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उमटायच्या आतच ‘रमा माधव’ चित्रपटाचे पोस्टर्स आणि दिग्दर्शक म्हणून पुन्हा एकदा मृणाल कुलकर्णी या दोन गोष्टींनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ‘रमा’ हे नाव मृणालपासून वेगळे करता येणार नाही इतकी ‘स्वामी’ मालिकेतील तिची रमा चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच बहुधा मृणाल दिग्दर्शक म्हणून रमा माधवची प्रेमकथा मोठय़ा पडद्यावर आणते आहे, असा विचार आपल्या मनात डोकावू लागतो. मात्र, ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात आलेल्या मृणालने ‘रमा माधव’च्या मागचा तिचा विचार सांगताना अवघी पेशवाई वेगळ्या नजरेतून उभी केली. मृणालबरोबरच छोटय़ा रमेच्या भूमिकेतील श्रुती कार्लेकर, रमा-माधव जोडी साकारणारे अलोक राजवाडे आणि पर्ण पेठे, आनंदीबाईंची भूमिका साकारणारी सोनाली कुलकर्णी, पार्वतीबाईच्या भूमिकेतील श्रुती मराठे आणि कथा-पटकथाकार मनस्विनी लता रवींद्र हेही या गप्पांमध्ये सहभागी झाले.
‘रमा माधव’ची प्रेमकथा फुलण्याआधी किंबहुना माधवाची रमेशी गाठ पडण्याआधीच पेशवाईत बरेच काही घडून गेले होते आणि घडू नये असे काही त्यांच्या आजूबाजूला घडतही होते. सोळा वर्षांचे माधवराव पेशवे आणि त्यांची बारा वर्षांची पत्नी रमा यांच्या आजूबाजूला असणाऱ्या पसाऱ्यात एकीकडे वडील म्हणून नानासाहेब-गोपिकाबाई होत्या. दुसरीकडे राजकीय महत्त्वाकांक्षेत हरवलेले काका रघुनाथराव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई तर तिसरीकडे सदाशिवराऊ भाऊंची पत्नी पार्वतीबाई होती. या तिकडीतील प्रत्येक कडीचा इतिहास, त्यातून घडत गेलेले त्यांचे वर्तमान आणि परिणामस्वरूप हाती आलेले पेशवाईचे भविष्य.. एवढा मोठा काळ, इतिहास या चित्रपटाने कवेत घेतला आहे, हे सहज ओघात सांगतच मृणालने गप्पांना सुरुवात केली. तेव्हा एवढा मोठा ऐतिहासिक पट करण्याचे आवाहन तिने का स्वीकारले, असाच प्रश्न पडला. त्यावर इतिहासाचे प्रेम रक्तातच आहे, असे तिने सांगितले.
‘ज्येष्ठ लेखक, दुर्गभ्रमंतीकार, इतिहासप्रेमी गो. नी. दांडेकर हे माझे आजोबा. माझ्या आईचे वडील. त्यामुळे लहानपणापासूनच इतिहासाशी नाते जोडले गेले. आजोबांशी होणाऱ्या गप्पागोष्टी, पुस्तकांचे वाचन आणि घरातील संस्कारामुळे इतिहासाविषयी आवड व प्रेम निर्माण झाले. त्यातच अभिनय क्षेत्रामुळे माझ्या सुदैवाने मला इतिहासकालीन तसेच पौराणिक स्त्री व्यक्तिरेखा करायची संधी मिळाली. यात द्रौपदी, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, मीरा आंबेडकर, माई सावरकर यांचा समावेश होता. म्हणजे इतिहासाशी माझे नाते कायम राहिले. सध्या विनोदी, सामाजिक आशय किंवा प्रेमकथा अशा विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. माझा पहिला चित्रपट ‘प्रेम म्हणजे..’ अशाच प्रकारचा होता. दुसऱ्या चित्रपटाचा विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा आपल्याला यापेक्षा काही वेगळे करता येईल का? असा विचार होताच. त्या वेगळेपणाच्या शोधातूनच ‘रमा माधव’पर्यंत पोहोचल्याचे तिने सांगितले. मात्र, आजच्या पिढीची इतिहासाबद्दलची अनास्था आणि अज्ञान या दोन गोष्टींनी आपल्याला ऐतिहासिक पट करण्यास भाग पाडल्याचेही तिने स्पष्ट केले.
 ऐतिहासिक चित्रपट करताना इतिहासातील संदर्भाचे भान पावलोपावली जपावे लागते. त्यामुळे या चित्रपटाचे कथारूप तयार करताना चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा उलगडण्यासाठी ‘पेशवे’ या पुस्तकाची मोलाची मदत झाली, असे तिने सांगितले. ‘रमा माधव’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद हे लेखिका मनस्विनी लता रवींद्र हिचे आहेत. ऐतिहासिक कथा लिहिण्याचा प्रसंगच आपल्यावर कधी आला नव्हता, पण मृणाल कुलकर्णीनी या चित्रपटासाठी कथा लिहिण्याची संधी दिली. मात्र, तेव्हाच तू इतिहासाचा सखोल अभ्यास करू नकोस. तुला तपशील मी देते. तू त्यांच्यातले नातेसंबंध, मानवी भाव-भावना यांचा आजच्या काळातील दृष्टिकोनातून विचार करत कथा लिही, असे सांगितल्याने थोडा ताण हलका झाल्याचे मनस्विनीने सांगितले. प्रत्येक घटना, प्रसंग यावर मृणालशी सतत चर्चा करून कथा लिहिल्याचेही तिने सांगितले. ऐतिहासिक चित्रपटांवरून नेहमी वाद निर्माण होतात. तसे वाद निर्माण झाले नाही पाहिजेत, असे मत मृणालने व्यक्त केले. इतिहासापासून काही शिकावे, झालेल्या चुका सुधारल्या जाव्यात हाच दृष्टिकोन चित्रपट करताना आहे. त्यामुळे ‘रमा माधव’ हा चित्रपट म्हणजे त्यांची प्रेमकथा नाही तर त्यापलीकडे जाऊन मानवी भावभावना आणि नातेसंबंधांचा घेतलेला शोध असल्याचे तिने या वेळी बोलताना सांगितले.
या चित्रपटासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकेर, पांडुरंग बलकवडे या इतिहासतज्ज्ञांची तसेच पुरातत्त्व विभागाचीही मोलाची मदत झाली. चित्रपटाचे चित्रीकरण प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘एनडी स्टुडिओ’त तसेच मुंबईतील मढसह सातारा, वाई, भोर येथे झाले. अगदी शनिवारवाडय़ाची पडझड झाली असली तरी त्याच्या तटाच्या भिंतींचा चित्रपटात खुबीने वापर केला असल्याची माहिती तिने दिली. अर्थात, या  चित्रपटात ‘पानिपत’चे युद्धही पाहायला मिळणार आहे. मात्र, युद्धाचा प्रसंग साकारताना रात्रंदिस आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्वत:ची अवस्था झाली होती, याची गंमतही तिने सांगितली. ‘पानिपतचे युद्ध दाखवण्यासाठी आम्ही कसेबसे आणि कुठून कुठून १५० घोडे मागविले होते. चित्रीकरणाच्या वेळी गंमत झाली. युद्धाच्या ‘मॉब’साठी बोलाविण्यात आलेल्या अनेकांना घोडय़ावरच बसता येत नव्हते. आमचे साहसदृश्य दिग्दर्शक रवी दिवाण म्हणाले की, हल्ली घोडय़ावर बसण्याचे प्रशिक्षणच कोणाला दिले जात नाही. शेवटी काहीजणांना घोडय़ावर बसण्याचा सराव देऊन तर काही जणांना किमान थोडा वेळ तरी घोडय़ावर स्थिर कसे बसता येईल, याची तयारी करून घेऊन आम्ही लढाई चित्रित केली आहे.’ हा संपूर्ण चित्रपट सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे, असे मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले.
‘आनंदीबाई’ची कथा आणि व्यथा लोकांसमोर येईल -सोनाली कुलकर्णी
‘अजिंठा’ चित्रपटात मी ‘पारो’ ही व्यक्तिरेखा रंगविली होती. पण आता ‘रमा माधव’मध्ये मी खऱ्या अर्थाने इतिहासातील प्रसिद्ध अशी ‘आनंदीबाई’ ही भूमिका साकारते आहे. मृणाल कुलकर्णी यांच्यामुळेच मला ही भूमिका करण्याची संधी मिळाली. आनंदीबाई यांच्याबद्दल मला यापूर्वी खूप माहिती नव्हती. त्या दिसायला खूप सुंदर होत्या, त्यांचे राजकीय ज्ञान चांगले होते, त्यांच्याकडे विविध प्रकारचे आणि खास बनवून घेतलेले ३२ सोन्याचे अलंकार होते, त्या त्यांच्या साडय़ाही खास तयार करून घ्यायच्या, अशी काही ढोबळ माहिती होती. चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची वेगळी ओळख झाली. आनंदीबाई यांचे आयुष्य म्हणजे एक शोकांतिका आहे. चित्रपटात त्यांची वेगवेगळी रूपे, त्यांच्या स्वभावाच्या विविध छटा पाहायला मिळतील. आनंदीबाई या राघोबादादांपेक्षा तेरा वर्षांनी लहान होत्या. ‘पेशवे’पदासाठी लायक असूनही आपल्या पतीला डावलले गेले, तेव्हा त्या चिडल्या. पुढे इतिहासात त्यांचा ‘राजकारणी’ हा पैलूही समोर आला. आनंदीबाईंसारख्या धोरणी स्त्रीची स्वत:ची अशी कथा-व्यथा होती, ती या चित्रपटातून पहिल्यांदाच लोकांसमोर येईल.