रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर आल्यापासून सर्वच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणारी ही जोडी या चित्रटात बोल्ड सीन देताना दिसेल. पण तुम्हाला माहित आहे का या दोन्ही कलाकारांची जोडी केवळ चित्रपटात नाही तर याआधीपासूनच एकमेकांसोबत सुंदर दिसते.
जर १८ वर्षांपूर्वी मागे फिरून पाहिले तर बॉलीवूड सुंदरी ऐश्वर्याने तिचे करियर सुरु केले होते. त्यावेळी रणबीर लहान होता. ऐश्वर्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली होती तर रणबीरला त्याचे बॉलीवूड करियर सुरु करण्यासाठी बरीच वर्षे बाकी होती. तिने ‘आ अब लौट चले’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यात अक्षय खन्ना हा मुख्य भूमिकेत होता. ऋषी कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता.  विशेष म्हणजे रणबीरही या चित्रपटाचा भाग होता. तुम्ही म्हणाल पण संपूर्ण चित्रपटात रणबीर दिसलाच नाही. मग तो या चित्रपटाचा भाग कसा? तर रणबीरने या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली होती. त्याचवेळी ऐश्वर्या आणि रणबीरचा फोटो काढण्यात आला होता. १८ वर्षांपूर्वी काढलेला हा फोटो या दोघांच्याही चाहत्यांना आनंदाचा धक्का देणारा आहे. हा फोटो रुमी जाफ्री यांनी ट्विट केला असून त्यास कॅप्शनही दिलेय की, मी खूप वर्षापूर्वी अमेरिकेत हा फोटो काढला होता. आता तुम्ही दोघंही एकत्र काम करत असून एकमेकांसोबत खूप छान दिसताय. तुमचा चित्रपट सुपरहिट व्हावा हिच शुभेच्छा.

आता हे दोन्ही कलाकार ‘ऐ दिल मुश्किल’ चित्रपटात फार वेगळे दिसत आहेत.  या चित्रपटात रणबीर-अनुष्काची जोडी असतानाही रणबीर-ऐश्वर्याच्या जोडीनेच सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत. अभिनेता फवाद खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. तब्बल चार वर्षांनंतर करण या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात परतला आहे. रणबीर, ऐश्वर्या, अनुष्का, फवाद अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘ऐ दिल है मुश्किल’ येत्या दिवाळीत २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.