टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ स्टार प्लस वाहिनीवर २००० साली सुरु झाला होता. त्यावेळी या शोमुळे बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या करियरला एक वेगळेच वळण मिळाले होते. टेलिव्हिजनवरील टॉप रिअॅलिटी शोमध्ये या कार्यक्रमाचे नाव येते. पण, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ‘देवियो और सज्जनो मै अमिताभ बच्चन आप सब का स्वागत करत हूँ’,’ हे भारदस्त आवाजातील वाक्य आता कदाचित ऐकायला मिळणार नाही. कारण, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आता अमिताभ बच्चन यांच्याऐवजी अभिनेता रणबीर कपूर हा ‘केबीसी’चे सूत्रसंचालन करणार असल्याचे समजते. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवव्या पर्वात रणबीर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड हंगामा या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कौन बनेगा करोडपती’च्या पुढच्या पर्वात अमिताभ बच्चन यांच्याऐवजी रणबीरच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण, ज्याप्रकारे ही चर्चा मनोरंजन वर्तुळात सुरु आहे ते पाहता ही केवळ एक अफवा असण्याचीही शक्यता आहे. केवळ मार्केटमध्ये हवा निर्माण करण्याकरिता हे वृत्त पसरविले जात असल्याचे बॉलीवूड हंगामाने म्हटले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या निर्मात्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, जर हे वृत्त खरे ठरले तर निश्चितच अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी असेल.

‘कौन बनेगा करोडपती’च्या २००० सालापासूनच्या सर्व पर्वांचे सूत्रसंचालन बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी केले आहे. मात्र, केवळ एका सिझनकरिता बॉलीवूड बादशहा शाहरुख खान याची या शोच्या सूत्रसंचालक पदी वर्णी लागली होती. पण, त्यावेळी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यास शाहरुख अयशस्वी ठरला होता. त्यामुळे नंतर पुन्हा एकदा अमिताभ यांनीच ‘केबीसी’च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळलेली.

दरम्यान, रणबीर कपूर हा आता लवकरच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कतरिना कैफनेही मुख्य भूमिका साकारली आहे. कतरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ चित्रपटाची निर्मिती रणबीर कपूर करत आहे. रणबीरच्या ‘पिक्चर शुरु’ या निर्मिती संस्थेअंतर्गत बनलेला ‘जग्गा जासूस’ हा पहिलाच चित्रपट आहे.