हे तर तुम्हाला ही माहित आहे की बॉलिवूड कलाकारांसाठी त्यांचे चाहते किती वेडे असतात. त्यात जर रणबीर कपूरसारखा हॅण्डसम हिरो असेल तर त्याच्या चाहत्यांची गिणतीच करु नये. त्याचे चाहते त्याच्यासाठी असे काही करत असतात की अनेकदा त्यालाच या सर्व गोष्टीचे आश्चर्य वाटते.

झाले असे की, काही दिवसांपूर्वी रणबीरने त्याच्या आजीच्या म्हणजे कृष्णा राज कपूर यांच्या घरी एका पार्टीचे आयोजन केले होते. पण जेव्हा त्याच्या घराच्या बाजूला असणाऱ्या हॉस्टेलमधल्या दोन मुलींना हे कळले, तेव्हा त्या दोन्ही मुली भिंतीवर चढून रणबीर दिसतो का ते पाहू लागल्या. नंतर रणबीर स्वतः त्या दोघींजवळ गेला आणि त्यांना भिंतीवरुन खाली उतरण्याचा सल्ला दिला. पण दोघींनीही भिंतीवरुन खाली उतरण्यास मनाई केली. एवढेच करुन त्या थांबल्या नाहीत तर, दोघींनी भिंतीवरुन उडी मारली. रणबीरसोबत एक सेल्फीही घेतली आणि नंतर त्या तिकडून निघून गेल्या.

दरम्यान, रणबीरच्या आगामी सिनेमांबद्दल विचार केला तर, रणबीर कपूर आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षीत ‘जग्गा जासूस’ या सिनेमाचे चित्रिकरण कधी सुरु होणार हा प्रश्न सिनेचाहत्यांना पडला आहे. आता या सिनेमाच्या निर्मात्यांनी कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यासमोर सिनेमाचे प्रमोशन कसे करायचे हा विचार मांडला. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी दोघांनाही आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून सिनेमा प्रमोट करण्याला प्राधान्य द्यावे असे सांगितले. मात्र कतरिनाला निर्मात्यांचा हा सल्ला मान्य नाही. तर दुसरीकडे रणबीर स्वतः या सिनेमाचा निर्माता असल्यामुळे त्याचे पैसेही या प्रोजेक्टमध्ये गुंतले गेले आहेत. सध्या चर्चा अशीही आहे की अनेकांनी कतरिनाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, कोणालाही त्यात यश मिळाले नाही.

तर दुसरीकडे, हिंदी चित्रपटसृष्टीतील लाडका ‘संजूबाबा’ म्हणजेच अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची निर्मिती होते आहे. राजकुमार हिरानी यांच्या सिनेमामध्ये बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार रणबीर कपूर या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या बहुचर्चित सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर रणबीर आपल्या आगामी ‘ड्रॅगन’ सिनेमातून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे चॉकलेट बॉय या चित्रपटापासून आपल्या अॅक्शनपटाला सुरुवात करतोय.