आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर राहणारी कतरिना आता मात्र सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही असेच दिसते. काही महिन्यांपूर्वी ती फेसबुकवर आली होती. त्यानंतर आता ती तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्राममार्फतही संवाद साधणार आहे. कालच तिने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. सलमान खाननेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा फोटो शेअर करत वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. ‘जॉली एलएलबी २’ मधील अभिनेत्री सयानी गुप्तानेही नुकताच कतरिनासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सयानीने शेअर केलेला हा फोटो अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. कारण खूप दिवसांनी कतरिना आणि रणबीरचा एकत्र फोटो पाहायला मिळतोय.

‘जग्गा जासूस’ सिनेमात सयानी आणि कतरिना एकत्र काम करत आहेत. त्यामुळे इन्स्टाग्रामवर तिचं खास स्वागत करण्यासाठी सयानीने कतरिनासोबतचा सेटवरचा फोटो शेअर केला. अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ सिनेमात रणबीर आणि कतरिनाच्या मुख्य भूमिका आहेत. या सेलिब्रिटी जोडीचा ब्रेक-अप झाल्यानंतर त्यांचे रस्ते वेगळे झाले होते. कोणत्याच कार्यक्रमाला हे दोघं त्यानंतर एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे रणबीर- कतरिनाला एकत्र फोटो पाहणे हा त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच मोठा जॅकपॉट असेल. पण, त्यांचा हा फोटो ब्रेक- अप पूर्वीचा आहे की नाही हे अजून कळू शकले नाही.

सयानीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘तुझे इन्स्टाग्रामवर स्वागत आहे. थँक्स टू रणबीर ज्याच्यामुळे हा फोटो धुरसट आला. पण आपल्या आठवणी धुरसट झालेल्या नाहीत.’ या फोटोमध्ये सयानी फार खूश दिसते. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने अनेकदा रणबीर हा हरहुन्नरी कलाकार असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘जग्गा जासूस’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाचा ट्रेलर पाहता काही तरी वेगळे कथानक असेल अशी आशा प्रेक्षक करत आहेत. ‘जग्गा जासूस’ या सिनेमातून रणबीर निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे. रणबीर-कतरिनाचा हा तिसरा चित्रपट असून ब्रेकअपनंतर ते पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी त्यांनी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनिती’ या सिनेमांत एकत्र काम केले होते. येत्या १४ जुलैला ‘जग्गा जासूस’ सगळ्यांच्या भेटीला येईल.