अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना ‘सरकार ३’ मध्येही त्यांना ‘सरकार’च्या भूमिकेत पाहता येणार आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच ‘सरकार’चा तिसरा सिक्वेल काढणार आहेत. या चित्रपटात ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणार आहे. ‘सरकार’ या सिनेमात सत्तरच्या दशकातला अमिताभ बच्चन यांचा ‘अँग्री यंग मॅन’वाला अवतारही पाहता आला होता. आता ‘सरकार ३’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रणदीप हुडाही असण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या सिक्वेलसाठी रणदीपला विचारले जात आहे.
या सिनेमासाठी रणदीपने होकार दिला तर अमिताभ आणि रणदीप हे पहिल्यांदाच एकत्र सिनेमा करतील. असे असले तरी, ‘सरकार ३’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कोणताही कलाकार निश्चित झालेला नाही असे राम गोपाल वर्मा यांनी सांगितले. सध्या तरी ते याबाबद काहीही बोलायला तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सरकारच्या या सिक्वेलमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन काम करणार नाही हे नक्की झाले असल्याचे वृत्तही हाती आले आहे.
राम गोपाल वर्माने ‘सरकार ३’ बद्दल सांगितले की, या सिनेमासाठी दोन तीन कल्पनांवर काम केले होते, पण त्या नाकारल्या गेल्या. पण आता मात्र त्यांच्याकडे अशी संहिता आहे ज्याच्यावर वर्मा आणि अमिताभ दोघेही खुश आहेत. पराग सांघवी अॅण्ड वेब्स ‘सरकार ३’ ची निर्मिती करणार आहेत. पुढच्या महिन्यापासून या सिनेमाची शुटिंग सुरु होईल. पुढच्यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.