बॉलीवुडमध्ये पार्टी करण्यासाठी काहीही निमित्त चालतं, तरीही नुकतीच झालेली एक पार्टी अनेक कारणांसाठी खास होती असेच म्हणावे लागेल. बऱ्याच काळानंतर झालेल्या या ‘बिग बॅश’ला हिंदी चित्रपट सृष्टीच्या अनेक कलाकारंनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, निर्माता- दिग्दर्शक करण जोहरसह इतरही प्रसिद्ध चेहरे हजर होते. तारे-तारकांच्या या मांदीयाळीत अभिनेता रणबीर कपूर आणि बॉलीवुडचे राम-लीला म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती.
रणबीर आणि रणवीरमध्ये असणाऱ्या मतभेदांच्या आणि वादावादीच्या सर्व चर्चांना झुगारत या दोघांनीही पार्टीत एकच धम्माल उडवली होती. पार्टीतली रणवीर आणि रणबीरची ही ‘डान्सफ्लोर’ गट्टी पाहण्यासारखी होती. त्यामुळे त्यांच्यात आता कोणत्याही प्रकारचे वाद असतील याची शंका करणेही चुकिचेच ठरणार आहे. पार्टीमध्ये सगळ्यांचीच धम्माल सुरु असताना दीपिकाचे हे दोन्ही खास मित्र वेगळ्याच मस्तीत असल्याचे दिसत होते. पार्टीत या दोघांनीही ‘जुम्मा चुम्मा दे दे’, ‘बद्तमीज दिल’ आणि ‘ दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ या गाण्यावर आपल्याच हटके अंदाजात थिरकत इतरांनाही या गाण्यांवर ताल धरायला लावले. बॉलीवुडच्या या दोन्ही बहुचर्चित अभिनेत्यांच्या धम्माल-मस्तीचे ट्विटरवरुन प्रसिद्ध झालेले हे व्हिडिओ सध्या प्रचंड गाजत आहेत.