‘बेफिक्रे’ या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या सिनेमासंबंधीच्या अनेक चर्चा बॉलिवूडमध्ये रंगताना पाहायला मिळाल्या. मग या सिनेमाचा ट्रेलर असो किंवा या सिनेमातली गाणी, तरुणाईला या गाण्यांनी चांगलेच वेड लावले. पण एखाद्या वस्तुची पॅकिंग जेवढी चांगली असते, त्यातली गोष्ट तेवढीच चांगली असेल असे नाही. तसंच काहीसं बेफिक्रेच्या बाबतीत बघायला मिळेल.

रणवीर सिंग आणि वाणीच्या प्रेमभंगापासून या सिनेमाला सुरुवात होते आणि मग सिनेमा हळूहळू पुढे सरकू लागतो. आजकालच्या तरुणाईची मानसिकता, प्रेम- मैत्री, नातेसंबंध या संबंधीचे अनेक प्रश्न आजच्या तरुणाईच्या मनात काहूर माजवत असतात. त्यामुळे कोणत्याही निर्णयावर पोहोचणं हे आजकालच्या पिढीसाठी अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसते. याच तरुणाईचे प्रतिनिधित्व करताना दिसेल धरम (रणवीर सिंग).
दिल्लीचा हा मुलगा फ्रान्समध्ये राहणाऱ्या शायराकडे (वाणी कपूर) आकर्षित होतो. कधीही प्रेमात न पडण्याच्या त्यांच्या अटींवर त्यांचे अफेअर सुरु होते. जस जसे कथानक सुरु होते तेव्हा सगळ्यावर रणवीरचीच पकड अधिक दिसते. आदित्य चोप्राचा सिनेमा म्हटल्यावर त्यात डीडीएलजेची झलक दिसल्याशिवाय राहत नाही. आई आणि मुलीचे नाते या सिनेमातही वेगळ्या रुपात दाखवण्यात आले आहे. तर ‘पलट’सारखे संवादही नव्या धाटणीने मांडण्यात आले आहे. पण म्हणून सिनेमा नवा होतो असे नाही. अनेक सिनेमांमधून असे कथानक मांडण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर आपण काही वेगळे पाहिले असे वाटत नाही.

बॉलिवूडमध्ये प्रेमाची परिभाषा नव्याने प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या काही दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे आदित्य चोप्रा. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पासून अगदी ‘रब ने बना दी जोडी’ पर्यंतच्या सर्वच सिनेमातून प्रेमालाच प्रकाशझोतात आणणारा आदित्य चोप्रा या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहे. गेला बराच काळ दिग्दर्शन क्षेत्रापासूनन दूर राहिलेले आदित्य चोप्रा एका नव्या धाटणीच्या कथानकासह प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडेल असे वाटत होते. पण प्रेक्षकांच्या या अपेक्षा फार पूर्ण होतात असे नाही. दिग्दर्शक आदित्य चोप्राची विशेष छाप या सिनेमाच्या दिग्दर्शनामध्ये दिसत नाही.

फ्रेंच, पॅरीसचे सुंदर दर्शन या सिनेमात दाखवण्यात आले आहे. या सिनेमाचे कथानक आणि पात्र पाहता फ्रेंच संवाद आणि शब्दांचा या सिनेमावर पगडा आहे. त्यामुळे सिनेमातून काही फ्रेंच वाक्य पाहायला मिळतात. वाणी अगदी सहजतेचे फ्रेंच बोलताना दिसते. या सिनेमासाठी वाणी आणि रणवीरने फ्रेंच भाषेचा रितसर अभ्यास केला होता. त्यामुळे वाणी कपूरच्या फ्रेंच ‘वाणी’ची झलकही मधे मधे पाहायला मिळते. सिनेमातली गाणीही लक्षात राहणारी नसली तरी त्या त्या प्रसंगांना साजेशी आहेत.

बाजीराव मस्तानीसारख्या धीरगंभीर सिनेमानंतर, बेफिक्रेमध्ये रणवीर पूर्णतः वेगळ्या भूमिकेत दिसतो. पण तो कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरतो तसाच तो या सिनेमातही दिसतो. त्यामुळे एखाद्या वेगळ्याच रणवीरला पाहतो असे कधीही वाटत नाही. तरीही संपूर्ण सिनेमा त्याने आपल्या खांद्यावर उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवून येते. त्यामुळे तो या सिनेमाचा आत्मा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

रणवीरसोबत काम करताना स्वतःची छाप पाडणे हे तसे मुश्किल काम. कारण त्याच्यातला उत्साह प्रत्येक दृश्यात दिसत असतो, त्यामुळे त्याच्या उत्साहाची बरोबरी साधताना वाणी कुठे तरी कमी पडते. असे असले तरी दोघांची केमिस्ट्री चांगली जुळून आली आहे.
मोकळेपणाने प्रेम करा, प्रेम व्यक्त करा, प्रेमासाठी बेफिक्रे व्हा असा काहीसा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. काहीही डोक्यात न घेता २ तास १० मिनिटांचे मनोरंजन हवे असेल तर हा सिनेमा पाहता येईल. त्यातही जर तुम्ही रणवीरचे चाहते असाल तर मग हा सिनेमा तुम्हाला रणवीरला पूर्णवेळ बघण्याची संधीच देतोय.