बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके अंदाजाने नेहमीच चर्चेत असतो. आपल्या ‘बेफिक्रे’ अंदाजाने चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला रणवीर पुन्हा एकदा त्याच्या वेगळ्या आणि अनोख्या लूकमुळे चर्चेत आला आहे. कपड्यांचा लोकप्रिय ब्रॅण्ड असणाऱ्या ‘जॅक एन जॉन्स’च्या प्रसिद्धीसाठी त्याने वेगळ्या रुपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा हा नवा अवतार अमेरिकेच्या कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखेशी म्हणजेच अॅक्वामॅनशी मिळता जुळता असल्याचे दिसते. त्यामुळेच या लूकमुळे तो हरहुन्नरी कलाकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते, असे म्हणता येईल. त्याच्या या नव्या लूकमुळे नेहमी नायकाच्या रुपात दिसणारा रणवीर नकारात्मक भूमिकेतही एक वेगळी छाप पाडू शकतो, असे संकेत देखील मिळतात. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्याच्यातील नव्या रुपाची सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते आहे.

काही दिवसांपूर्वीच रणवीरने त्याच्या अंगी असलेला रॅपरच्या झलक दाखवून दिली होती. शब्दांची जुळवाजुळव आणि त्याला वेगळीच चाल देण्याची रॅपरची कला अवगत असणारा रणवीर लवकरच पुन्हा एकदा रॅपरच्या अवतारात सर्वांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने रणवीर अनुष्का मनचंदासोबत एक रॅप साँग गाणार असून, या चित्रपटातही तो एका रॅपरचीच भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीरच्या ‘गली बॉय’ हा चित्रपट कुर्ला परिसरातील झोपडपट्टीमधील नावेद शेख नावाच्या एका रॅपरच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये रणवीर आलिया भट्टसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटातील ही जोडी यापूर्वी ‘मेक माय ट्रिप’च्या जाहिरातीतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. छोट्याशा जाहिरातीला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे ‘गली बॉय’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता निर्माण झाली आहे.