बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके अंदाजाने नेहमीच चर्चेत असतो. त्याचा लूक असो अथवा एखाद्या चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी विनोदी शैलीत व्यक्त होण्याची त्याची शैली यामुळे बॉलिवूडच्या इतर कलाकारांपेक्षा तो वेगळा असल्याचे दिसून अनेकदा दिसून आले आहे. त्याचा हा अनोखा अंदाज आता पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या इन्स्टाग्रामवरील एन्ट्रीनंतर रणवीरने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. भारतामध्ये वेळेत येणाऱ्याची काहीच किंमत नसते, जो उशीरा येतो त्याला स्टार समजले जाते, असे रणवीर या व्हिडिओमध्ये म्हटल्याचे दिसते. कॅप्शनमध्ये रणवीरने लिहिलंय की, ‘इन्स्टाग्रामच्या दुनियेत तुमचे स्वागत आहे. कतरिना कैफ!

बॉलिवूडची बँग बँग गर्ल कतरिनाने फेसबुकवरील सक्रियतेनंतर इन्स्टाग्रामवरही अकाऊंट सुरु केले. गुरुवारी कतरिना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली. नेटिझन्सनीसुद्धा इन्स्टाग्रामवर तिला चांगली पसंती दिली. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी तिला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, तिच्या पहिल्याच फोटोला लाखापेक्षाही अधिक लाइक्स मिळाल्याचे पाहायला मिळाले. नेटिझन्स कतरिनाला पसंती देत असताना रणवीरने अनोख्या अंदाजात तिचे स्वागत केले. रणवीरने शेअर केलेल्या व्हिडिओलाही नेटिझन्स चांगली पसंती देत आहेत.

रणवीरचा हा व्हिडिओ ६ लाखहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. कतरिनासाठी मागील वर्ष काही खास नव्हते. २०१६ मध्ये कतरिनाचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. मागील वर्षातील अपयश विसरुन कतरिना कैफ कामाला लागली आहे. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येते.