काही दिवसांपूर्वी मेनका गांधी यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी सिनेमे जबाबदार आहेत असं म्हटलं होतं. ही गोष्ट रवीना टंडनला फारशी पटली नाही. तिने यासंदर्भात ट्विट करुन तिची मतं मांडली. रवीनाने महिलांच्या सुरक्षिततेवर जोर देत, जे असा गुन्हा करतात त्यांच्या विरुद्ध अधिकाधिक सक्त कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले.

अभिनेत्रीने २२ एप्रिलला एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो ट्विटरवर टाकला. ‘ज्या लोकांना ‘मातृ’ सिनेमा योग्य वाटला नाही, याचा अर्थ काही तरी गडबड आहे. सत्य जरी कटू असलं तरी त्यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे.’

यावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी लिहिले की, ‘हो रवीना, अशा घटनांमुळे मीही चिंतेत आहे. आम्ही कठोर कारवाई करुन अशा घटनांना आळ घालण्याचा प्रयत्न करत आहोत.’

गांधी यांच्या ट्विटला उत्तर म्हणून रवीनाने परत एक ट्विट केले. ‘हो, कायद्याचे पालन होणं आणि आरोपींना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. जलदगती न्यायालयात या घटनांची सुनावणी होणे आवश्यक आहे.’

नुकताच रवीनाचा ‘मातृ’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना न्याय देण्याच्या प्रयत्नांत न्यायालयीन व्यवस्था कशी अयशस्वी ठरते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या सिनेमाचे सर्वाधिक चित्रीकरण दिल्ली आणि हरियाणा भागात झाले आहे. अश्तर सैय्यद दिग्दर्शित या सिनेमात रवीना टंडनसह हसल मलिक, मधुर मित्तल, दिव्या जगदल, शैलेंद्र गोयल, अनुराधा अरोरा, सहीम खान आणि रुशाद राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.