रिअॅलिटी शो हे त्यांच्या आगळ्यावेगळ्या स्वरुपामुळे चर्चेत असतात. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे स्पर्धकही विविध कारणांनी प्रकाशझोतात येतात. त्यापैकीच एक कारण म्हणजे त्या कलाकारांचं खासगी आयुष्य. सध्या ‘बिग बॉस’ या अशाच एका बहुचर्चित रिअॅलिटी शोमधील दोन स्पर्धकांची नावं चर्चेत आली आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी आणि ‘बिग बॉस’मुळेच सर्वांसमोर आलेला मनवीर गुर्जर यांचं नाव सध्या जोडलं जात असून हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय.

याविषयीच मनवीरने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीत काम्यासोबतच्या नात्यामागचं सत्य उघड केलं. ‘मी स्पेनवरुन परतल्यापासूनच माझं नाव एका व्यक्तीसोबत जोडलं जातंय’, असं म्हणत काम्या पंजाबीसोबत आपलं नेमकं कोणत्या प्रकारचं नातं आहे हे मनवीरने स्पष्ट केलं. ‘मी तिच्याविषयी काही चांगलं बोललो तर आमच्यात काहीतरी सुरु आहे असाच तुमचा समज होईल. पण मी खरच तिची दाद देऊ इच्छितो कारण, माझ्या ध्यानीमनी नसतानाही ती मला पाठिंबा देत होती. ती माझ्या कुटुंबियांपर्यंत गेली, एक व्हिडिओ शूट करून त्यात कलर्सला टॅग केलं. माझ्या कुटुंबापैकी कोणीच हे केलं नसतं कारण, त्यांच्यापैकी कोणीच सोशल मीडियाचा वापर करत नाही. मी स्वत: फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं. तिने माझा चेहरा सर्वांपर्यंत पोहोचवला’, असं म्हणत मनवीरने काम्याचे आभार मानले. काम्याविषयी बोलताना त्याच्या वक्तव्यातून अभिमान व्यक्त होत होता.

यापुढे तो म्हणाला, ‘तिच्या पाठिंब्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मीसुद्धा तिला एका पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळालं तेव्हा पाठिंबा दिला होता. किंबहुना पुरस्कार जिंकल्यानंतर तिने ‘मी एका खास व्यक्तीचे आभार मानू इच्छिते’, असं म्हणत माझे आभारही मानले होते.’ मनवीर आणि काम्यामधील या अनपेक्षित नात्याबद्दल आता बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. पण, त्याबद्दल कोणताही गैरसमज करुन घेऊ नये असंही मनवीरने म्हटलं. शेवटी त्याने ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, ज्याप्रमाणे मी नितिभासोबत फिरतो त्याचप्रमाणे अगदी एका मित्रासारखा मी काम्यासोबतही असतो’ असं म्हणत या सर्व गोष्टी स्पष्ट केल्या.

नितिभा कौलसुद्धा मनवीरसोबत ‘बिग बॉस’च्या घरातील एक स्पर्धक होती. या कार्यक्रमानंतर तिच्या आणि मनवीरच्या नात्याविषयीच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. टेलिव्हिजन विश्वातील मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शिअल घरातील हे दोन्ही स्पर्धक एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.