रिअॅलिटी शोच्या या गर्दीत जवळपास दोन वर्षांपूर्वी ‘डान्स प्लस’ नावाचा शो आला आणि फार कमी काळातच या शोने लोकप्रियतेचं परमोच्च शिखर गाठलं. नृत्यदिग्दर्शक रेमो फर्नांडिस आणि त्याचे विद्यार्थी धर्मेश, शक्ती, पुनित या डान्सर्सच्या साथीने काही अफलातून आणि नृत्यकलेत पारंगत असलेल्या होतकरु कलाकारांची कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अशा या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यामध्ये बऱ्याच स्पर्धकांमधून बीर राधा शेर्पा याने विजेतेपद मिळवलं आहे. शनिवारी पार पडलेल्या अंतिम सोहळ्याच्या वेळी विजेता म्हणून शेर्पाचं नाव घोषित करण्यात आलं तेव्हा उपस्थितांमध्ये त्याच्याच नावाचा कल्ला पाहायला मिळाला. त्याशिवाय शेर्पाच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा होता.

या कार्यक्रमाचं विजेतेपेद पटकावणाऱ्या बीरवर पारितोषिक स्वरुपात २५ लाख रुपये, ह्युंडाई आय२० कार, ओप्पो फोन, अॅमोझॉनचं एक लाख रुपयांचं वाऊचर आणि सुझूकी जिग्सर एसएफएफआय बाईक अशा बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. मुळचा आसाममधील सिलचरचा असणारा बीर ‘डान्स प्लस ३’मध्ये पुनित पाठकच्या टीममध्ये होता ‘बी- बॉईंग’ आणि ‘कन्टेम्प्ररी’ या नृत्य प्रकारांमध्ये पारंगत असून, गेल्या काही आठवड्यांपासून त्याच्या नृत्याने परीक्षकांनाही भुरळ पाडली होती. इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं जेतेपद मिळवलेल्या बीरने प्रेक्षकांचे, परीक्षकांचेही आभार मानले. त्याने हे यश आपल्या आईला समर्पित केलं असून, यात तिचा मोलाचा वाटा असल्याचंही स्पष्ट केलं.

https://www.instagram.com/p/BZZJ_iTFn_J/

‘डान्स प्लस ३’च्या निमित्ताने सर्वसामान्य कुटुंबातील बीरलाही एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे वागवलं जाऊ लागलं. मुख्य म्हणजे सोशल मीडियावरही त्याच्या फॉलोअर्सचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुनितच्या टीममधील २४ वर्षीय बीर राधा शेर्पा ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाला होता. ‘बी- बॉईंग’ या नृत्यप्रकारात पारंगत असणारा शेर्पा त्याच्या नृत्यशैलीने भल्याभल्यांना नमवतो. आपल्या कुटुंबावर जिवापाड प्रेम करणारा बीर प्रत्येक गोष्टीत कुटुंबीयांचे सल्ले घेतो. आयुष्यातील आजवरच्या मोठ्यात मोठ्या निर्णयामध्ये त्याला कुटुंबियांची साथ मिळाली आहे. नृत्याच्या बळावर ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याने स्थानिक पातळीवरही बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. बीरला मिळालेलं यश, त्याची अनोखी नृत्यशैली, प्रेक्षकांचं प्रेम आणि डान्स गुरुंची साथ या साऱ्याच्या बळावर बीर आगामी काळात आणखी कोणता टप्पा पार करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.