‘रोडिज’ आणि ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेला प्रिन्स नरुला आता अभिनय क्षेत्रातही चांगलाच रुळला आहे. रोडिजच्या ऑडिशन्सपासूनच त्याच्या फिमेल फॅन फॉलोइंगचा आकडा वाढला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरातही प्रिन्सचा सहभाग असल्यामुळे त्याचा चेहरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला. टेलिव्हिजन विश्वात अनेक तरुणींची मनं जिंकणारा प्रिन्स त्याच्या खासगी आयुष्यामुळेही बराच चर्चेत असतो. सध्याच्या घडीला तो टेलिव्हिजन अभिनेत्री युविका चौधरीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रिन्सचं नाव युविकासोबत जोडलं जाऊ लागलं. याच कार्यक्रमात त्या दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यानंतर सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट पाहून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.

विविध कार्यक्रमांमध्येही त्यांच्या या रिलेशनशिपबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याला कारण होतं प्रिन्स आणि युविकाच्या सोशल मीडिया पोस्ट आणि एकमेकांच्या फोटो, व्हिडिओंवर व्यक्त होण्याची त्यांची पद्धत. इतकच काय, तर हे दोघंही लवकरच साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण, युविकाने नुकतच एका मुलाखतीत प्रिन्ससोबतच्या तिच्या नात्यावरुन पडदा उचलला. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका मुलाखतीदरम्यान प्रिन्ससोबत आपण रिलेशनशिपमध्ये नसल्याचं युविकाने स्पष्ट केलं. तिच्या या वक्तव्यानंतर लगेचच प्रिन्सने त्यांचं हे नातं सर्वांसमोर उघड केलं.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या माहितीत प्रिन्स म्हणाला, ‘मी याधीही सांगितलंय की, मला ती आवडते. ती खरंच खूप चांगली आहे आणि मला तिच्यासोबत वेळ व्यतीत करायला आवडतो. दुर्दैवाने एकमेकांना वेळ देण्याची संधी आम्हाला फार कमीच मिळते. आम्हाला एकमेकांना समजून घेण्यासाठी आणखी वेळ मिळावा अशीच माझी इच्छा आहे. मी तिच्या होकाराचीच वाट पाहतोय.’ प्रिन्सच्या या वक्तव्यामुळे त्याच्या आणि युविकाच्या नात्यात नेमकं काय सुरु आहे याच एका प्रश्नाने अनेकांना पेचात पाडलं आहे. प्रिन्ससोबत असलेल्या नात्याविषयी युविकाने कधीही उघडपणे चर्चा केली नसली तरीही तो आपला खूप जवळचा मित्र असल्याचेच म्हटलं आहे. त्यामुळे प्रिन्सला आता ती होकार देणार का आणि त्याला त्याची प्रिन्सेस भेटणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.