करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाने रसिकांची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आजच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर या सर्वांनीच सोशल मिडीयावरून ट्रेलरची हवा निर्माण केली होती. त्याचा परिणाम आज बघावयासही मिळत आहे. पण या सगळ्यात ऐश्वर्या मात्र कुठेच दिसली नाही.
चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये ऐश्वर्या कुठेच दिसत नाहीए. डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऐ दिल है मुश्किल’मधील गाणी आणि ट्रेलर लॉन्च वगळता ऐश्वर्या कोणत्याच प्रसिद्धी कार्यक्रमात दिसली नाही. तसेच, चित्रपटाच्या टीमसोबत शहरांचे दौरे करणेही तिने टाळले आहे. ऐश्वर्याच्या अशा वागण्यामागचे कारण तिची मुलगी आराध्या आहे. ऐश्वर्याला आराध्यासोबत राहायचे असून आपल्या मुलीला जास्त वेळ एकटं सोडून चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना जाणे तिला योग्य वाटत नाहीये. या चित्रपटासाठी करारबद्ध होण्यापूर्वी ऐश्वर्याने चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरकडे आपल्या मुलीविषयी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या.  दरम्यान, चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता फवाद खान हा देखील प्रसिद्धी कार्यक्रमांपासून दूर आहे. करणला फवादच्या भूमिकेविषयी गुप्तता बाळगायची असल्या कारणाने असे पाऊल उचलण्यात आल्याचे कळते.
‘रोमॅण्टिक ड्रामा’ प्रकारात येणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान, अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट पाहता येणार आहे. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक हाताळत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्याच भूमिकेत दिसणारी ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये रसिकांसाठी करण जोहर त्याच्या तगड्या स्टारकास्टसह ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणेल.