एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची स्वतःच्या हाताने लिहिलेली पत्रे आणि मासिकासाठी लिहिलेल्या स्तंभलेखातून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातल्या अनेक गोष्टी नव्याने समोर आल्या आहेत.

१९७८ मध्ये त्या कुमुदम या तामिळ मासिकासाठी स्तंभलेख लिहायच्या. त्याच काळात प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे नाव फार चर्चेत होते. म्हणूनच स्तंभलेखनाच्या माध्यमातून आपले बालपण, आईसोबतचे नाते, प्रसिद्धी याबाबत त्यांनी लिखाण केले. त्यांच्या लिखाणातून वाचकांना त्यांच्या बालपणाबद्दल कळून येते. त्या लहानपणी आपल्या आईला वेधाला म्हणजेच संध्याला भेटण्यासाठी फार उत्सुक असायच्या. कारण आई सिनेमांमध्ये काम करत असल्यामुळे त्या चेन्नईमध्ये राहायच्या.

१९४८ मध्ये कर्नाटकमध्ये जयललिता यांचा जन्म झाला. जयललिता यांच्या बालपणीच त्यांचे वडील वारले. त्यानंतर अनेक वर्ष त्या आपल्या आईपासूनही दूर राहत होत्या. जयललिता या बंगळुरू येथे राहत होत्या तर जयललिता यांची आई कामानिमित्त चेन्नईत राहत होत्या.
चार वर्षांची असताना आमचे संपूर्ण कुटुंब चेन्नईत राहायला आले. माझी आई चित्रपटांमध्ये व्यस्त झाल्याने माझा आणि माझ्या भावाचा सांभाळ घरातले नोकर करू लागले. आमचं अशाप्रकारे होत असलेलं पालनपोषण आईला योग्य वाटत नव्हतं. मग तेव्हापासून मी दहा वर्षांची होईपर्यंत माझ्या आजी-आजोबांकडे राहू लागले. मला तेव्हा आईची खूप आठवण यायची. तिला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती आम्हाला भेटायला यायची. पण असं फार कमी वेळा व्हायचं. मला आठवतं, मी पाच वर्षांची असताना आई मला भेटायला यायची. ती मला सोडून जायची तेव्हा मला रडू कोसळायचं. त्यामुळे जाण्यापूर्वी ती मला झोपवून जायची. मग मीही तिचा पदर हाताला बांधून झोपायचे. झोपताना मी आईचा पदर हाताला घट्ट बांधायचे. तिलाही ती गाठ सोडणं कठीण व्हायचं म्हणून मग ती पदर माझ्या हातात तसाच राहू द्यायची आणि साडी सोडायची. तीच साडी नंतर माझी मावशी गुंडाळून माझ्या बाजूला झोपायची. अशाप्रकारे ती कधी जायची ते मला कळायचं देखील नाही. जेव्हा मला ती गेल्याचं कळायचं तेव्हा मी फक्त रडत बसायचे. बंगळुरुमध्ये राहत असताना असा एकही क्षण नसेल जेव्हा मला आईची आठवण आली नाही, असे ‘रॉन्डेवू विथ सिमी गरेवाल’ शोमध्ये जयललिता म्हणाल्या होत्या.

जयललिता यांनी त्यांच्या घराचे नाव आईच्या नावारुन म्हणजे वेधा निलयम असे ठेवले होते. माझ्या आईने सिनेमांसाठी तिचे नाव संध्या असे केले होते. माझं घर सजवताना कोणते पडदे हवे, कार्पेट हवे हे सर्व आईनेच ठरवले होते. पण या सगळ्याचा उपभोग ती घेऊ शकली नाही. काणर त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

याशिवाय शिवाजी गणेशन यांना भेटलेल्या अनुभवाबद्दलही त्यांनी लिहिले होते. शिवाजी गणेशन यांनी जयललिता यांचे १९६० मधले पहिले भरतनाट्यमचे नृत्य पाहिले होते. त्या आठवणीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, जेव्हा ते भाषण करायला गेले तेव्हा त्यांनी जयललिता यांचे सोन्याची मूर्ती असे कौतुक केले होते. शिवाय सिनेसृष्टीत फार चांगले नाव होईल असेही त्यांनी त्यावेळी म्हटले होते. पुढे त्यांनी लिहिले की, पण भविष्यात मी त्यांच्यासोबत एखादा सिनेमा करेन असे त्यांनाही कधी वाटले नसेल.

त्यांच्या स्तंभलेखात त्या पुरुषांना कशा ओळखायच्या याबद्दलही लिहिले आहे. त्यांनी आपल्या वडिलांबद्दल लिहिताना म्हटले की, ते एक असे व्यक्ती होते जे स्वतः कोणतीही गोष्ट नीट हाताळू शकत नव्हते. त्यांना फक्त आराम करायला आवडायचे. यानंतर अधिक लिहिले तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना त्याचा त्रास होईल यामुळे त्यांनी मासिकामध्ये स्तंभलेख लिहिणे बंद केले. जेव्हा त्या या मासिकासाठी स्तंभलेख लिहित होते तेव्हा त्यांचे नाव राजकीय गुरु एमजी रामचंद्रन यांच्याशी जोडले जात होते.