‘हीरो नंबर वन’, ‘कुली नंबर वन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांचा समावेश

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘नंबर वन’ चित्रपट मालिकांनी तिकीटबारीवर एकच गोंधळ घातला होता. विनोदी चित्रपटांची एक लाटच त्याकाळी आली आणि गोविंदा रातोरात सुपरस्टार विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रिय झाला. त्यानंतर आपल्या समकालिनांप्रमाणे पुन्हा एकदा चित्रपटात नशीब आजमावून पाहण्याचा गोविंदाने केलेला प्रयत्न फसला असला तरी त्याच्या चित्रपटांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे या चित्रपटांचे निर्माता वाशू भगनानी यांनी गोविंदाच्या तीन गाजलेल्या चित्रपटांचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाशू भगनानी यांची ‘पूजा एन्टरटेन्मेट अँन्ड फिल्म्स लिमिटेड’ ही प्रॉडक्शन कंपनी आणि ‘इरॉस इंटरनॅशनल’ यांनी एकत्र येऊन हिंदी चित्रपटांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘ढिश्शूम’ या साजिद नाडियादवाला निर्मित आणि रोहित धवन दिग्दर्शित चित्रपटाबरोबरच रवी जाधव दिग्दर्शित ‘बँजो’चे वितरणही या दोन कंपन्या एकत्रित येऊन करणार आहेत. मात्र बिग बजेट चित्रपटांच्या वितरणाबरोबरच रिमेक चित्रपटांच्या निर्मितीसाठीही आपण ‘इरॉस इंटरनॅशल’बरोबर भागीदारी केली असल्याचे वाशू भगनानी यांनी म्हटले आहे. सुरुवातीला गोविंदाचा ‘हिरो नंबर वन’, ‘कु ली नंबर वन’ आणि मग ‘बडे मियाँ तो छोटे मियाँ’ या तीन चित्रपटांचे रिमेक करण्यात येणार आहेत. गोविंदाचे हे चित्रपट त्याकाळी खूप लोकप्रिय ठरले. या चित्रपटांचे मनोरंजनमूल्य लक्षात घेता त्यांचे रिमेकही लोकांना आवडतील आणि म्हणूनच नव्वदच्या दशकातील या चित्रपटांचे रिमेक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाशू भगनानी यांनी स्पष्ट केले.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये गोविंदा आणि अमिताभ बच्चन ही जोडी एकत्र आली होती. रिमेकमध्ये काही दृश्यांसाठी का होईना त्यांना पुन्हा एकत्र आणण्याची इच्छा भगनानी यांनी व्यक्त केली आहे. गोविंदाचा विनोदी अभिनय, त्याची अजब नृत्यशैली हीच या चित्रपटांची खरी ओळख आहे. त्यामुळे नव्या कलाकारांना घेऊन रिमेक करताना गोविंदाच्या तोडीचा आणि साजेसा कलाकार शोधणे हे निर्मात्यांसाठी खरे आव्हान ठरणार आहे. नव्या पिढीमध्ये अनेक चांगले कलाकार रिमेकसाठी उपलब्ध असल्याचा विश्वास भगनानी यांनी व्यक्त केला.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटासाठी ‘ब्रदर्स’मधील जोडी अक्षय कुमार आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनाच एकत्र आणणार असल्याची चर्चा असली तरी निर्मात्यांनी त्यावर अजून शिक्कामोर्तब केलेले नाही. गोविंदाच्या चित्रपटानंतर त्यावेळच्या आणखी काही चित्रपटांचा रिमेक करणे हाच मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.