रेणुका शहाणे यांची मागणी; राज ठाकरे यांनीच पाठपुरावा करण्याची सूचना; केंद्रीय मंत्र्यांची मनसेवर टीका

पाकिस्तानी कलाकारांचा मला कोणताही पुळका नाही पण केवळ ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटावर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. पाकिस्तानी कलाकार मुळातच भारतात येऊन काम करू शकणार नाहीत, असे ठोस धोरण राष्ट्रीय स्तरावरच केंद्र शासनाकडून तात्काळ तयार केले जावे, असे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी असे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचा पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात असलेला आपला असंतोष व्यक्त करायचाच असेल तर तो सनदशीर मार्गाने व्यक्त करता येऊ शकतो. ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट कोणीही पाहू नये, त्यावर संपूर्ण बहिष्कार टाकावा आणि तो हक्क बजावून आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करता येऊ शकते, तसे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या अनुयायांना करावे, असे सांगून त्यासाठी कायदा हातात का घ्यावा, कोणाला धमक्या का द्याव्यात, िहसक आंदोलन का करावे, असा सवालही शहाणे यांनी उपस्थित केला.

कला क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा, व्यवसाय आणि अन्य सर्वच क्षेत्रात पाकिस्तानशी आपण कोणतेही संबंध ठेवू नये. पाकिस्तानी कलाकार रीतसर व्हिसा घेऊन भारतात येतात. त्यामुळे या कलाकारांना  कोणत्याही प्रकारचा ‘व्हिसा’ दिला जाऊ नये. पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तातडीने ठोस भूमिका व धोरण ठरविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ए दिल है मुश्किलला केंदाचेही संरक्षण

केंद्र शासनानेही ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाला संरक्षण देण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.    चित्रपटाचा चमू व हिंदीतील काही चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृह राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांची भेट घेतली. या भेटीनंतर चित्रपटाचे प्रदर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आपण बोलू तसेच कोणत्याही गोंधळाविना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी निर्माते मुकेश भट्ट यांना सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा गुंडांचा पक्ष आहे. त्यांना कायदा हाती घेण्याची मुभा दिली जाऊ नये. – बाबुल सुप्रियो, केंद्रीय मंत्री व शिष्टमंडळाचे सदस्य