बर्फाच्या दुलईखाली लपलेले, वरवर शांत भासणारे काश्मीर, त्या दुलईवर उमटणारे चिनारच्या रक्तवर्णी पानांचे नक्षीकाम, दाल लेकच्या काठाने दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमधून बारीक कलाकुसर करणारा छोटासा नूर आणि त्याचे कुटुंब एकीकडे आहे, तर दुसरीकडे दूर उंच वृक्षराजींमध्ये लपलेली एक जुनी, आलिशान, गतवैभवाच्या खुणा अंगावर वावरत उभी असलेली एक हवेली, अशी सगळी चित्रे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आपोआपच आपण मंतरलेल्या अवस्थेत एखादी परीकथा पाहायला मिळावी त्या उत्साहाने सरसावून बसतो. मात्र काश्मिरी गालिच्यावर विणलेल्या या चित्रकथेतील लाल केसांच्या फिर्दोसचा तिला एकटक पाहात राहणारा नूरही जितका अपेक्षाभंग करत नसेल त्यापेक्षा मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक अभिषेक कपूरने प्रेक्षकांचा केला आहे.

चार्ल्स डिकन्सच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित ‘फितूर’ हा चित्रपट सतत कुठे तरी दिग्दर्शकाच्या कादंबरी आणि काश्मिरी प्रेमातच अडकून पडलेला वाटतो. दिग्दर्शक म्हणून विशाल भारद्वाजने शेक्सपिअरच्या वेगवेगळ्या कथा रुपेरी पडद्यावर आणल्या, मात्र त्या कथांना भारतीय व्यक्तिरेखा आणि कथेच्या साच्यात चपखल बसवण्याचे जे काम विशाल भारद्वाजने केले तसा प्रयत्न करू पाहणाऱ्या अभिषेकला ते अजिबात जमलेले नाही. त्यामुळे सुंदर काश्मीर, तब्बू-कतरिना आणि आदित्य हे आघाडीचे आणि वेगळे कलाकार, दमदार कथा असा सगळा जामानिमा असतानाही अभिषेकचा ‘फितूर’ एक क्षणही मनाची पकड घेत नाही. दाल लेकच्या काठावर राहणाऱ्या, गरिबीत वाढलेल्या छोटय़ाशा नूरच्या (आदित्य रॉय क पूर) आयुष्यात हवेलीत राहणाऱ्या फिर्दोस (कतरिना कैफ)च्या रूपाने प्रेमाचा शिरकाव होतो. मात्र फिर्दोसवरच्या प्रेमाबरोबरच तिची अम्मी बेगम हजरतच्या (तब्बू) मनातील छुप्या भावनांच्या कल्लोळानेही नूरच्या आयुष्यात प्रवेश केलेला असतो. फिर्दोसवर जडलेली नूरची नजर आणि नूरवर खिळलेली बेगमची नजर हा लपंडाव नूर मोठा झाला तरी त्याच्या आयुष्याचा पिच्छा सोडत नाही. आपल्या कलेमुळे अगदी कमी कालावधीत आपल्या वाटय़ाला आलेला नावलौकिक आणि त्याच वेळी पुन्हा फिर्दोसचे प्रेम मिळवण्याची निर्माण झालेली आशा या दुहेरी आनंदात असलेल्या नूरसमोर ज्या तीन गोष्टींचा उलगडा होतो त्यामुळे त्याच्या एकूणच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. या नाटय़मय क थावळणात फिर्दोस आणि नूरच्या निस्सीम प्रेमकथेचा एक तुकडा, बेगमच्या गतआयुष्याचा एक तुकडा, छोटय़ा नूरच्या आयुष्यात अतिरेक्याचा (अजय देवगण) अचानक झालेला प्रवेश आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याशी जोडण्याचा अर्धवट प्रयत्न अशा ठिगळाठिगळातून विणलेला हा काश्मिरी प्रेमकथेचा गालिचा मुळातच विसविशीत असल्याने तो फारसा प्रभाव टाकत नाही.

‘रॉक ऑन’ आणि ‘कायपोचे’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर ‘फितूर’ हा दिग्दर्शक म्हणून अभिषेक कपूरच्या कारकीर्दीतील कळसाध्याय ठरेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. ‘फितूर’ हा त्याचा दिग्दर्शक म्हणून वेगळा प्रयत्न आहे. चित्रपटाचा एकूण टोन, कमीत कमी संवाद आणि नजरेतून व्यक्तिरेखांचा होत गेलेला संवाद या नेहमीच्या मसाला चित्रपटात कधीही न दिसणाऱ्या बाजू ‘फितूर’मध्ये सुंदर पद्धतीने येतात. त्याला आदित्य रॉय कपूर आणि कतरिनाने प्रामाणिक साथ दिली आहे. बेगमच्या भूमिकेत तब्बू भाव खाऊन जाणार हे साहजिकच होते. त्यामुळे काश्मीरचे सौंदर्य आणि हे कलाकार यांना जे काम करायचे होते ते त्यांनी पूर्ण केले असले तरी एक तरल प्रेमकथा म्हणून तरी त्याचा जो प्रभाव पडायला हवा होता तोही पडत नसल्याने हा चित्रपट खूप मोठा अपेक्षाभंग ठरला आहे.

फितूर

कलाकार – तब्बू, कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर, लारा दत्ता, राहुल भट्ट, तलत अझीज

दिग्दर्शन – अभिषेक कपूर

पटकथा – अभिषेक कपूर, सुप्रतीक सेन

संगीत – अमित त्रिवेदी, कोमेल शयन