सत्तरच्या दशकात चॉकलेट हिरो म्हणून बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश करणारा, ‘आरके’ बॅनरचा वारसा घेऊन आलेला ऋषी कपूर नामक तरुण चार दशके हिरो म्हणून नायिकांना खेळवत राहिला. ‘चॉकलेट हिरो’चं हे कार्ड वापरून वापरून गुळगुळीत होईल इतकं खेळवल्यानंतर या नायकाने आपली सद्दी सोडली. त्याच वेळी बॉलीवूडची सूत्रे दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रासारख्या पुढच्या पिढीकडे आली होती. आदित्य चोप्राचं बोट धरूनच करण जोहरने आधी अभिनेता आणि मग दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकलं होतं. या दोघांचीही आत्मचरित्रं काही दिवसांच्या अंतराने प्रकाशित झाली आहेत आणि सध्या चच्रेचा विषय ठरली आहेत. दोन भिन्न काळातील रुपेरी पडद्यावरच्या या दोन मोहऱ्यांच्या निमित्ताने खरं म्हणजे बॉलीवूडला पुढे नेणारे काळाचे दोन मोठे तुकडे सर्वसामान्यांसमोर जोडले जायला हवेत. मात्र त्याऐवजी त्यांची आत्मचरित्रं ही वैयक्तिक आयुष्यातील ताणेबाणे, अफेअर्सच्या चर्चाची पेल्यातील वादळे ठरली आहेत. कलाकारांच्या चरित्रात्मक पुस्तकांचा बाज मर्यादित असल्यानेच वाचकांच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व कधीच वाढले नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

बॉलीवूडमधली कंपूशाही नवीन नाही. या कंपूंमध्ये आदित्य चोप्रा आणि करण जोहर या मंडळींचा कंपू सगळ्यात मोठा मानला जातो. त्यात शाहरुख, हृतिक, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या, काजोल, करीना कपूर खान ते आत्ताच्या अलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफपर्यंत अनेकांचा समावेश आहे, हेही सर्वश्रुत आहे. मात्र तरीही करणच्या ‘अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्राची प्रकाशनपूर्व चर्चा सुरू व्हायला कारणीभूत ठरला तो त्याने काजोल आणि त्याच्या बिघडलेल्या नातेसंबंधांविषयी लिहिलेला भाग. काजोल आणि करण जोहर यांच्यात इतकी घट्ट मत्री होती आणि एका छोटय़ाशा प्रसंगाने आता काजोल आपल्या आयुष्यात येऊच शकत नाही, इतकी जाहीर कबुली देईपर्यंत हे नाते ताणले गेले याची कल्पना त्या किश्शामुळे सगळ्यांना आली. त्याच्या पाठोपाठ चार-पाच दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांचे ‘खुल्लमखुल्ला : ऋषी कपूर अनसेन्सॉर्ड’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. ज्यात त्यांनी त्यांच्या रोखठोक स्वभावाला साजेशा पद्धतीने काहीही हातचं राखून न ठेवता आपल्या वडिलांच्या- राज कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून स्वत:च्या यशापयशापर्यंत अनेक गोष्टींची खुल्लमखुल्ला चर्चा केली आहे. गेल्यावर्षी आलेल्या अभिनेत्री रेखा यांच्या आयुष्यावर आधारित ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकानेही असंच चर्चाचं वादळ निर्माण केलं. आत्ताची ही एखाद-दोन उदाहरणं सोडली तर हिंदीत किंवा मराठीतही कलाकारांच्या चरित्रात्मक पुस्तकांवरून फारसे वाद कधी झाले नाहीत, अशी माहिती ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी दिली. फार कमी कलाकार आत्मचरित्र लिहितात. बऱ्याचदा त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेत पत्रकारांनी किंवा काही लेखकांनी कलाकारांची चरित्र पुस्तके लिहिलेली आढळतात. हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये कलाकारांच्या आत्मचरित्राचे प्रमाण जास्त आहे, असं ते म्हणतात. मराठीत अगदी दुर्गा खोटेंपासून ‘मी दुर्गा खोटे’, शांता आपटे यांचं ‘जाऊ मी सिनेमात?’, अभिनेत्री सीमा देव यांचं ‘देवघर’, जयश्री गडकर यांचं ‘अशी मी जयश्री’, सचिन पिळगावकर यांचे ‘हा माझा मार्ग एकला’ अशी अनेक उदाहरणे देता येतात.हिंदीत दिलीप कुमार, देव आनंद, प्राण यांची आत्मचरित्रं आहेत. पण, तरीही कलाकारांनी स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिण्याची संकल्पना बॉलीवूडमध्ये अजूनही फारशी प्रचलित नाही, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

चित्रपटांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा मनोरंजन इथपर्यंतच मर्यादित असल्याने त्या त्या काळात कलाकारांवर अनेक पुस्तके येत गेली पण ती फारशी गाजली नाहीत, याकडे ठाकूरांनी लक्ष वेधले. मात्र एकंदरीतच कलाकारांच्या चरित्रात्मक पुस्तकांचे अभ्यासात्मक मूल्य कमी असतं, असं मत चित्रपट अभ्यासक सतीश जकातदार यांनी व्यक्त केलं. दिलीप कुमार, नसिरुद्दीन शहा ही दिग्गज मंडळी. त्यांची आत्मचरित्रं शब्दांकन केलेली आहेत. कित्येकदा ही आत्मचरित्रं आपण माणूस म्हणून कसे चांगले आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे नसीर यांचे चरित्र वाचतानाही त्यांचे चित्रपट, त्यांच्या भूमिकांविषयी सविस्तरपणे जाणून घेता येत नाही. नसिर आणि श्याम बेनेगल यांच्यात सुरुवातीच्या काळात काय घडलं, त्यांनी चित्रपट कशा पद्धतीने केले याबाबत लिहिले जात नाही. हॉलीवूडमध्ये अशाप्रकारची चरित्रं ही फार प्रामाणिकपणे लिहिली जातात. त्यामुळे कलाकार आणि दिग्दशर्कातील नातं, एकमेकांना समजून घेत कलाकृती घडवण्याची प्रक्रिया, सिनेमाची अंगं अशा अनेक गोष्टी विस्ताराने समजून घेता येतात, असं सांगणाऱ्या जकातदारांनी आणखी एक गमतीदार मुद्दय़ाकडे लक्ष वेधलं. आपल्याकडची चरित्रपर पुस्तके बारकाईने वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल, ते म्हणजे सर्वसामान्य माणूस ते कलावंत म्हणून घडण्याचा त्यांचा जो काळ असतो तो लिहिताना त्यात सच्चेपणा असतो. मात्र एकदा चित्रपटसृष्टीत शिरल्यानंतरचा जो काळ येतो तो फार सावधपणे, समजून-उमजून लिहिलेला लक्षात येतो. आपल्याकडे सी. रामचंद्र, विश्राम बेडेकर यांच्यासारख्या मंडळींनी उत्स्फूर्ततेने आत्मचरित्रे लिहिली होती, असं जकातदार सांगतात. मात्र गेली कित्येक र्वष बॉलीवूड-हॉलीवूड कलाकारांना बोलतं करणाऱ्या, त्यांना जवळून अभ्यासणाऱ्या चित्रपट समीक्षक, लेखिका अनुपमा चोप्रा यांचं मत वेगळं आहे.

‘नुकताच करण जोहरच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला तेव्हा मी तिथे उपस्थित होते. प्रसिद्ध लेखिका शोभा डे तिथे होत्या. करणशी बोलण्याआधी त्या म्हणाल्या की त्यांनी त्यांच्या चरित्राचे नावच ‘सिलेक्टिव्ह मेमरीज’ ठेवलं होते. कारण आपण जेव्हा आपल्या आयुष्याबद्दल लिहायला बसतो तेव्हा त्या आठवणी निवडूनच आपण त्याबद्दल बोलत असतो. मला वाटतं चरित्रात्मक पुस्तकांची रचना या अशा निवडक घटनांवरच केलेली असते’, असं अनुपमा चोप्रा सांगतात. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही. तुम्ही ऋषी कपूर यांचं आत्मचरित्र वाचलंत तर त्यांनी खूप बेधडकपणे अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एक चॉकलेट हिरो म्हणून त्यांची इतक्या वर्षांची कारकीर्द समजून घ्यायला, त्यांच्या आयुष्यातील उतार-चढाव लक्षात घ्यायला हे लिखाण मदत करतं. मुळातच आपल्याकडे इतिहासाचं जतन करण्यासाठी का होईना तत्कालीन घटना, व्यक्ती, संदर्भ हे कुठेतरी लिहून ठेवले गेलेच पाहिजेत. दुर्दैवाने ती इतिहास-संदर्भ जतन-संवर्धन करण्याची संस्कृतीच आपल्याकडे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपण करण जोहरच्या पुस्तकाबद्दल कितीही चर्चा केल्या तरी त्यांनी या इंडस्ट्रीविषयी, इथल्या नातेसंबंधांविषयी आपल्या अनुभवातून लिहिलं आहे. आजपासून वीस वर्षांनंतर जेव्हा कधी कोणाला या काळातील चित्रपट संस्कृतीचा म्हणून अभ्यास करावासा वाटेल, तेव्हा त्याच्यासाठी हीच पुस्तकं आधारभूत ठरणार आहेत. त्यामुळे या पुस्तकांना कमी लेखू नये, उलट जास्तीत जास्त लोकांनी लिहितं व्हावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कलाकारांची चरित्रं बाजारात आणताना संबंधित कलाकारांबरोबरच ते पुस्तक   लिहिणारे लेखक आणि प्रकाशकांचीही महत्त्वाची भूमिका असते, असे प्रतिपादन ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या संपादिका अस्मिता मोहिते यांनी केले. कलाकाराची एक प्रतिमा असते आणि ती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र त्यांचे चरित्र जेव्हा लोकांसमोर आणायचे असते तेव्हा तो कलावंत, अभिनेता समजून घेण्याच्या दृष्टीने पुस्तकाचा फोकस ठेवायचा की केवळ त्याच्या आयुष्यातील लोकांना आकर्षति करू शकतील, अशाच घटनांवर लक्ष केंद्रित करायचे याचे भान, याचा मूळ विचार प्रकाशकाने करणे गरजेचे असते, असं सांगतानाच त्यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्राबद्दलचा अनुभव सांगितला. ‘साधना’मधून लागू यांचे लेख येत होते तेच संकलन करायचं होतं. पण पुस्तक म्हणून आणताना त्यावर सखोल विचार होणं गरजेचं होतं. इथे भटकळांची लागूंशी असलेली मत्री कामी आली. त्यांनी जातीने वेळोवेळी लागूंबरोबर चर्चा करून, त्यापद्धतीचं लिखाण कारून घेऊन ‘लमाण’ आकारास आणलं. आता नसिरुद्दीन शहांचं ‘आणि एक दिवस’ हे आत्मचरित्र आम्ही अनुवादित स्वरूपात आणलं त्यामुळे त्यावर संस्कार करण्याचे अधिकार आमच्याकडे नव्हते. पण त्यांचं मूळ इंग्रजी पुस्तक पेंग्विन प्रकाशनने आणलं आहे. तुम्ही त्यांची प्रस्तावना जरी वाचलीत तरी हे सहज लक्षात येईल की काहीतरी वाद घडवावेत, या दृष्टिकोनातून पुस्तकाचे लेखन झालेले नाही. तिथे पेंग्विनच्या संपादकांनी एका विचारातून पुस्तकाचे सादरीकरण केलं आाहे. त्यामुळे प्रकाशकाची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरते, असं त्यांनी सांगितलं. कलाकारांनी दृक्-श्राव्य माध्यमातून सादरीकरण केलेलं आहे. त्यामागे अनेक घटनाक्रम, संदर्भ असू शकतात, ते महत्त्वाचे असल्याने चरित्रपुस्तकांची निर्मिती होते. पण काहीही झाले तरी ते त्या कलाकारांचे मुक्तचिंतन असते. तिथे खरे-खोटेपणा करण्यासाठी वाव नसतो. त्यामुळे पुस्तकाचे हस्तलिखित हातात आल्यानंतर ते वाचणं, तपासणं ही प्रकाशकांची जबाबदारी असते, असं ‘राजहंस प्रकाशन’च्या पणशीकरांनी सांगितलं.

स्वत: बॉलीवूडचा किंग शाहरुख खानवर ‘किंग ऑफ बॉलीवूड – शाहरुख खान अँड द सिडक्ट्व्हि वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अनुपमा चोप्रांनी कलाकारांवर पुस्तक लिहिताना लेखकांनी त्यांचं अधिकाधिक वास्तव मांडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असं सांगितलं. ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’सारख्या पुस्तकातून त्या कलाकाराच्या वैयक्तिक वादग्रस्त घटनांची चर्चा जास्त झाली. लोकांना असे विषय आकर्षति करतात हे खरं आहे. मात्र आपण त्या कलाकाराबद्दल लिहिताना किंवा कुठलाही विषय मांडताना त्यातून त्या व्यक्तीचा आपल्याला समजलेला काही एक विचार वाचकांपर्यंत पोहोचायला हवा. त्या चरित्रातून वाचकांना कुठलाच विचार मिळणार नसेल, तर त्याला अर्थ नाही, असं चोप्रा यांचं म्हणणं आहे. कलाकारांना त्यांची प्रतिमा सातत्याने जपावी लागत असल्याने त्यांच्याकडून लिखाणात येणारा सावधपणा, हातचं राखून सांगितलेल्या किंवा प्रचारकी पद्धतींच्या गोष्टी यामुळे कलाकारांच्या चरित्रपटांना आजही प्रतिष्ठा नाही हे वारंवार दिसून आलं आहे. पण तरीही या पुस्तकांच्या निमित्ताने हा इतिहास कुठेतरी जतन होतो आहे हेही दुर्लक्षित करण्यासारखे नाही. त्यामुळे या पुस्तकांच्या निमित्ताने उठणाऱ्या पेल्यातील वादळांकडे दुर्लक्ष करायला हवं.