ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या निशाण्यावर होते ते काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी. राहुल गांधी यांनी मंगळवारी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल यांच्या या भाषणातील काही मुद्दे ऋषी यांना पटले नाही आणि त्यांनी आपला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.

सचिन खेडेकरांच्या ‘बापजन्म’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

राजकारणामधील घराणेशाहीवर बोलताना राहुल म्हणाले की, ‘देशातील अनेक पक्षात आजही घराणेशाही चालते. मग ते अखिलेश यादव असो किंवा करुणानिधी यांचा मुलगा स्टालिन… सगळीकडे घराणेशाही आहेच. एवढेच काय तर बॉलिवूड क्षेत्रात, व्यावसायिकांमध्येही घराणेशाही आहे. अभिषेक बच्चनपासून ते अंबानी कुटुंबियांपर्यंत सगळीकडे घराणेशाही पाहायला मिळते. इन्फोसिसही काही यापेक्षा वेगळे नाही.’
राहुल यांच्या या विधानामुळे ऋषी कपूर यांचा पारा चढला आणि त्यांनी एका मागोमाग एक असे तीन ट्विट करत आपला राग व्यक्त केला.

‘राहुल गांधी, १०६ वर्षांच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात कपूर कुटुंबियांचे सिनेसृष्टीत ९० वर्षांचे योगदान आहे आणि प्रत्येक पिढीला त्यांच्यातील गुणांमुळे लोकांनी स्विकारले आहे,’ असे पहिले ट्विट केले. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘देवाच्या कृपेने आमची चौथी पिढी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि आता रणबीर कपूर.

आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये ऋषी यांनी म्हटले की, ‘तुमच्यासारख्या लोकांनी राजघराण्यावर व्यर्थ बडबड करु नये. तुम्ही लोकांनी जबरदस्ती आणि गुंडगिरी न करता अथक मेहनत करुन जनतेचे प्रेम आणि सन्मान मिळवला पाहिजे.’ ‘घराणेशाही’, ‘चाचा- भतिजा वाद’ किंवा ‘नेपोटिझम’ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हे विषय गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. आता कुठे याविषयीच्या चर्चां थांबल्या होत्या, तोच राहुल गांधी यांच्या भाषणामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. येत्या काही दिवसांमध्ये हा वाद कोणते नवे वळण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.